अमरावती - शहरातील शेगाव-राहाटगाव परिसराच्या सीमेलगत असणाऱ्या नागरी वसाहतीतून सांडपाणी वाहून नेणारी नाली तुंबली असताना ती साफ करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार देऊनही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी थेट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. याप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालायाने या प्रकरणात चक्क अमरावती महापालिलेला नोटीस बजावली आहे.
काय आहे प्रकरण? -
शेगाव-राहाटगाव परिसरातील अर्जून नगर भागात येणाऱ्या रत्नदीप कॉलनी, सोनल कॉलनी, मुक्ता नगर परिसरातून वाहणाऱ्या नालीमधले पाणी ओम कॉलनी येथील मोठ्या नालीत वाहत येते. मात्र, ओम कॉलनी येथील एका खुल्या भूखंडाजवळ ही नाली तुंबली असून नालीत अनेकदा सांडपाणी रस्त्यावरून वाहते. या त्रासाबाबत परिसरातील नागरिक गत अनेक वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडे तक्रार देत आहेत. मात्र, महापालिकेने अद्यापपर्यंत याची दखल घेतली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या भागात गंधे नामक व्यक्तीचे घर बांधणे सुरू होते. त्यासाठी बांधकाम साहित्य घेऊन येणाऱ्या वाहनांना नालीवरून जाता यावे, यासाठी या नालीत मुरूम टाकून नाली बुजवण्यात आल्याने तुंबलेल्या नालीतील घाण रस्त्यावर येत आहे.
महापालिका प्रशासनाकडे केली तक्रार -
ओम नगर परिसरात नालीचे पाणी तुंबल्याने परिसरातील रहिवासी असणारे अॅड. गजेंद्र सादर यांना मलेरियाची लागण झाली होती. तसेच परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिकांनी 2 मार्च रोजी महापालिका प्रशासनाकडे तक्रार देऊन परिसरातील नाली साफ करण्याची विनंती केली होती. मात्र, साधी नाली साफ करण्याच्या विषयाला महापालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही.
न्यायालयात याचिका दाखल -
ओम कॉलनी परिसरात बुजलेली मुख्य नाली साफ करून नालीचा प्रवाह सुरळीत करण्याबाबत महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने ओम कॉलनी परिसरातील राहिवासी अॅड. गजेंद्र सादर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 18 मे रोजी अमरावती महापालिकेला नोटीस बजावली आहे.