अमरावती - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाची दयनीय अवस्था झाली आहे. जिथे दोन वेळची चुल पेटवनेही कठीण त्या घरात भाजीपाला तरी कसा पोहचेल. पण, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेमधील मुस्लीम बांधवांनी माणुसकीचा परिचय देऊन तब्बल १५० कुटुंबाना मोफत भाजीपाला वाटप केला आहे.
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर भागातील आठवडी बाजार येथे राहणारे भाजी विक्रेते जावेद अहमद शेख उस्मान या मुस्लीम युवकाने सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या भागातील गरीब लोकांना मोफत भाजीपाला वाटप केले. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत बबलू लसनवाले यांनी मोफत लसूण, अद्रक व बबलू भाई सब्जीवाले, नावेद भाई सब्जीवाले यांनीसुद्धा त्यांच्या कार्यात मोलाचे सहकार्य केले.
भारतातील हिंदू असो व मुस्लीम जर देशसेवेची संधी आली तर या देशातील प्रत्येक नागरिक सेवेसाठी तत्पर असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आतापर्यंत त्यांनी मोलमजुरी करणाऱ्या १५० कुटुंबांना घरपोच मोफत भाजीपाला नेऊन दिला. यावेळी त्या गरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान हीच आमच्यासाठी अल्लाहाची मेहरबानी असल्याचे मुस्लीम बांधवांनी सांगितले.