अमरावती - शहरात मंगळवारी दोन वेगवेगळ्या घटनेतील दोघांच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज पुणे येथून विद्रोही कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी शैलेश नवल आणि पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्याशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्र्यांनी गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या.
मंगळवारी अर्पिता ठाकरे आणि सौरभ गोसावी या दोघांच्या हत्येमुळे अमरावती शहरासह संपूर्ण जिल्हा हादरला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी तातडीने व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे दोन्ही अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
अर्पिता ठाकरे हत्याप्रकरणात पोलिसांनी तातडीने दोषारोपपत्र सादर करावे. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यास दक्ष राहावे. यापुढे अशा घटना घडू नये याची काळजी घ्यावी. पोलिसांनी लव्ह ट्रॅपबाबत शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम राबवून जनजागृती करावी. विद्यार्थ्यांसह पालकांना अशा स्वरूपाच्या दुष्परिणामांची माहिती करून द्यावी. आपल्या पाल्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देण्याचे आवाहन पालकांना करावे. मोबाईल फोन आणि टीव्हीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचीही माहिती विद्यार्थी आणि पालकांना करून द्यावी. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आशा ठिकाणी युवक-युवतींच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवावे. अनुचित प्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करावी. शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी दिली.
दारूमुळे हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे. शहर आणि ग्रामीण भागात दारूची अवैध विक्री होऊ नये याची दखल पोलिसांनी घ्यावी. पोलीस आणि महसूल विभागाने एक हेल्पलाईन सुरू करून कुठलीही अनुचित घटना घडणार नाही यावबाबत दक्ष असावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.