अमरावती - माझ्या नवऱ्याचे दोन वर्षांपूर्वी एका आजाराने निधन झाले. घरातला कर्ता पुरुष अकाली निघून गेला. या फाटक्या संसाराची जबाबदारी माझ्यावर आली. लोकांच्या घरी धुनी-भांडे करून कसतरी पोट भरते. पण कोरोनामुळे तेही बंद झालं. त्यात महावितरणने १० हजारांचे बिल पाठवले. माझ्या मुलीला दोन महिन्यापूर्वी बाळ झाले तीही येथेच राहते. त्यात बिल भरायला महावितरणचे साहेब जबरदस्तती करत होते. मी त्यांना म्हटलं, साहेब थोडे थोडे पैसे भरते. त्यांना हात जोडून विनवणी करत होती. पण त्या साहेब लोकांनी माझ्या घरातील दोन महिन्यांच्या चिमुकल्या लेकराचाही विचार केला नाही आणि वीज कापून टाकली. मागील २४ तासापासून आम्ही अंधारात आहोत. या दोन महिन्यांच्या लेकराची परिस्थिती काय असेल, हे त्यालाच माहीत. ही मन हेलवणारी व्यथा आहे अमरावती जिल्ह्यातील मोझरीतील शोभा हिवराळे या निराधार महिलेची.
मोझरी गावातील दलित वस्तीत शोभा हिवराळे राहतात. घरची परिस्थिती जेमतेम. पतीचे निधन झाल्याने कुटुंबाचा सांभाळ त्याच करतात. दुसऱ्याच्या घरी धुनी-भांडी करून घर चालवतात. मात्र, कोरोनामुळे लोक कामाला बोलवत नाही. त्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. यातच महावितरणने १० हजारांच्या बिलाचा शॉक हा लहानशा घरात राहणाऱ्या शोभा बाईला दिला. उसनवार करून आधी तीन हजार भरले पण आता सात हजार भरायचे होते. त्यात घरी मुलीची प्रसुती झाली. अशा परिस्थितीत पैसे भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या घरची वीज ही महावितरणने कापली आहे. बिल भरण्यासाठी थोडी सवलत द्या, अशी मागणी ही केली. पण त्यांनी माझा तर सोडा, माझ्या घरातल्या लहान चिमुकल्याचा विचार ही केला नाही, असे त्यांनी सांगितले. उन्हाळ्यात त्या लहान जीवाला काय त्रास होत असेल, ते त्यांना काय कळणार असे शोभाबाई म्हणल्या. त्यामुळे वीज जोडून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
साहेब हे मंगळसूत्र घ्या, गहाण ठेवा, पण वीज कापू नका -
महावितरणचे वाढीव बिल भरू शकत नसल्याने मोझरीतील दलित वस्तीतील या महिला महावितरणच्या कार्यालयात थेट मंगळसूत्र घेऊन पोहोचल्या होत्या. 'हे मंगळसूत्र गहाण ठेवा आणि तुम्हीच आमचं बिल भरून टाका' अशी मागणी या महिलांनी केली होती. यावेळी शोभाबाई हिवराळे या सुद्धा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे आपले मंगळसूत्र घेऊन गेल्या होत्या.
हेही वाचा - मुख्यमंत्री पद सोडाच उद्धव ठाकरे साधे दुकानही चालवू शकत नाहीत -निलेश राणे