अमरावती - मी १८ तास काम करते. मात्र, तुम्ही ८ तास प्रामाणिकपणे काम करा. खेड्या-पाड्यातून शंभर-दोनशे रुपये खर्च करून लोक कार्यालयात येतात. त्यामुळे त्यांची कामे प्रामाणिकपणे झाली पाहिजे. ते तुमचे कर्तव्य आणि धर्म आहे. दर ३ महिन्याला जनता दरबार घेऊन जनतेच्या तक्रारींचा काय निपटारा झाला, याचा आढावा घेणार आहे, अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला. अंजनगाव सुर्जी येथे सोमवार (२० जानेवारी)ला जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
जनता दरबारात नागरिकांनी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयाविषयी तक्रारी नोंदविल्या. जवळपास १६५ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. पीक विमा, दुष्काळ निधी, घरकुलच्या निधीबाबत, तर काही कर्मचाऱ्यांविरुद्ध देखील तक्रारी करण्यात आल्या. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्याप्रसंगी नगराध्यक्ष अॅड. कमलकांत लाडोळे, माजी आमदार रमेश बुंदिले, तहसीलदार विश्वनाथ घुगे व इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. या जनता दरबाराला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे या जनता दरबाराला आमदार बळवंत वानखडे यांची उपस्थिती नसल्याने जनतेत चर्चेचा विषय होता.
हे वाचलं का? - नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे, 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
जनता दरबार आयोजनामुळे लोकांच्या समस्येचा त्वरित निपटारा होतो. अशा प्रकारचे जनता दरबार लोकप्रतिनिधींनी घ्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.