अमरावती - नवमीच्या पर्वावर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कार्यकर्त्यांसह अंबादेवी मंदिर परिसरात धडकले. यावेळी राणा दाम्पत्याने मंदिर सर्वांसाठी उघडावे असा अट्टाहास धरला. यावेळी युवास्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात गोंधळ घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंदिर उघडावे यासाठी खासदार नवनीत राणा सातत्याने मागणी करीत आहेत. आज नवमीच्या पर्वावर राणा दाम्पत्य कार्यकर्त्यांसह राजापेठ येथील युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यालयातून पायी चालत अंबादेवी मंदिर परिसरात पोहचले. यावेळी मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. मंदिराच्या मागच्या दारातून राणा दाम्पत्य मंदिरात जायच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना अडवून कार्यकर्त्यांना बाहेर ठेवा, तुम्हा दोघांना आता जाता येईल, असे सांगितले. आमदार रवी राणा यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मंदिरात प्रवेश नसेल तर आम्ही पण मंदिरात जाणार नाही, असे म्हणताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
दरम्यान, आम्ही आरती बाहेरून करू, आत जाणार नाही, असे नवनीत राणा यांनी म्हटल्यावर मंदिराच्या मागील आवारात युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देवीच्या आरतीचे गायन केले. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी देवीची ओटी घेण्यास पुजाऱ्याने मंदिराबाहेर यावे, अशी मागणी केली. यानंतर दोन पुजारी मंदिराबाहेर आले आणि त्यांनी खासदार नवनीत राणा यांनी अंबादेवीसाठी आणलेली ओटी स्वीकारली.
राज्यात दारुची दुकाने सुरू होतात मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंदिर सुरू करण्याचे आदेश देत नाहीत. आमचा मंदिर प्रशासनावर रोष नाही. या परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. नवरात्रोत्सवात भाविक सोशल डिस्टन्सिंग ठेवून देवीचे दर्शन घेऊ शकत असते. मात्र, उद्धव ठाकरेंनी भविकांवर अन्याय केला, असा आरोप खसदार नवनीत राणा यांनी यावेळी केला. अंबादेवी मंदिराप्रमाणेच बंद असणाऱ्या एकविरादेवी मंदिरासमोरही राणा दाम्पत्यासह कार्यकर्त्यांनी आरती केली. यावेळी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.