अमरावती- खासदार नवनीत राणा यांची 7 वर्षाची मुलगी आणि 4 वर्षाच्या मुलाला कोरोना झाला असून राणा कुटुंबात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 10 झाली आहे. खासदारांच्या घरातच कोरोनाने शिरकाव केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
खासदार नवनीत राणा यांचे सासरे आणि बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या वडिलांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना शनिवारी (1 ऑगस्ट) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आमदार राणा यांच्या आई, बहीण, जावई, पुतण्या, भाची आणि अंगरक्षकला कोरोना झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, काल आमदार राणा यांची मुलगी आणि मुलासह भाचाही कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्याच्या मुलांना कोरोना झाल्याचे समोर येताच महापालिका आयुक्त प्रशांत रोडे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शामसुंदर निकम हे राणा यांच्या शंकर नगर येथील निवासस्थानी पोहोचले. सध्या खासदार नवनीत राणा यांच्या घराला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यांच्या मुलांसह भाच्याला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार रवी राणा यांचे आई-वडील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल आहेत.
कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 470 वर
अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 470 वर पोहोचला असून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केवळ शनिवारी आणि रविवारी संचारबंदी जाहीर करण्यापलीकडे काहीही केले गेले नाही. गंभीर बाब म्हणजे, या दोन दिवसांच्या संचारबंदी दरम्यान नागरिक सहज घराबाहेर पडू शकतात इतकी शिथिलता आहे. आता जिल्ह्याच्या खासदारांच्या चिमुकल्या मुलांसह त्यांच्या घरातील 10 सदस्य कोरोनाबाधित झाले असताना जिल्हा प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी गंभीरपणे निर्णय घेणार का, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा- अमरावतीत भाजपला आंदोलनासाठी दूध मिळेना; रिकामे कॅन घेऊन आंदोलन करण्याची वेळ