अमरावती - राज्यात जवळपास सहा लॉकडाऊननंतर राज्यात एसटी प्रवासाला सुरुवात झाली. मात्र, खराब रस्ते आणि त्यामुळे एसटी झालेले हाल प्रवास करताना लक्षात येते. यातच जिल्ह्यातील मेळघाटसारख्या भागात २०-२० वर्ष जुन्या झालेल्या एसटी बस या आदिवासी बांधवांच्या दिमतीला असून त्यांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचा गंभीर आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर केला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे चार दिवसीय मेळघाट दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मेळघाटातील समस्यांचा आढावा घेत आहेत. मेळघाटात आरोग्य यंत्रणेसोबतच वाहतुकीचे फार साधन उपलब्ध नाही. त्यामुळे एसटी बस आदिवासी बांधवांची जीवनवाहिनी आहे. मात्र, रस्त्यासह येथे धावणाऱ्या एसटीची अवस्थाही अतिशय वाईट आहे. याच बाबींचा आढावा घेण्यासाठी आज खासदार नवनीत राणा यांनी एसटी बसने प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी एसटीचे दार उघडे ठेऊन रस्त्यासह एसटीची झालेली दुर्दशा दाखवतानाचा एक व्हिडिओदेखील तयार केला आहे.
महाराष्ट्रात सर्वात खराब बस मेळघाटच्या नशिबात आल्या आहे. २०-२० वर्षे जुन्या आणि खराब झालेल्या बस मेळघाटला देऊन आदिवासींच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप खासदार आणि आमदार यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे मागील ६ महिन्यांपासून पगार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आतातरी बाहेर निघून लोक कसे जगतात ते पाहावे असे म्हणत पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा - अमरावती: शेतकऱ्यांना दिलासादायक! हिरव्या मिरचीला बाजारात प्रति किलो ६५ रुपये भाव