अमरावती - दिल्लीमध्ये गेल्या 60 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात किसान आझादी आंदोलनाच्या बॅनरखाली विवीध संघटनांच्या वतीने शनिवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, नव्या कृषी कायद्यांची निर्मिती केली आहे. हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून, ते तातडीने रद्द करावेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत.
आंदोलन दडपण्यासाठी हिंसाचार
26 जानेवारीला जे काही घडले ते दुर्दैवी होते. हा प्रकार शेतकरी आंदोलन दडपण्यासाठीच्या षडयंत्राचा भाग होता. खर तर दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावरच सुरू आहे. हे एक आदर्श आंदोलन असल्याचं आंदोलकांनी म्हटले आहे.
धरणे आंदोलनात विविध पक्ष, संघटनांचा सहभाग
आजच्या धरणे आंदोलनात कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, कामगार संघटना, मुस्लीम लीग, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा सहभाग होता.