अमरावती - पावसाळा ऋतू गिर्यारोहकांसाठी एक पर्वणीच असतो. निसर्गाच्या सानिध्यात व दऱ्याखोऱ्यात असलेल्या मेळघाटात दरवर्षी हजारो गिर्यारोहक हे ट्रेकिंगसाठी येतात. ट्रेकिंगसाठी आलेला एक गट पूरात अडकला होता. नागपूर, अमरावती, पुलगाव, परतवाडा आदी ठिकाणाहून आलेल्या ५०पेक्षा अधिक गिर्यारोहकांनी व पर्यटकांनी मेळघाटाच्या कलाकुंड बगदारी नदीच्या पुरातून एकमेकांचा जीव वाचवला.
गेल्या रविवारी सुटीचा दिवस असल्याने काही गिर्यारोहक हे मेळघाटामध्ये आले होते. सकाळच्या सुमारास हे गिर्यारोहक दाखल झाले तेव्हा वातावरण कोरडे होते त्यामुळे त्यांनी ट्रेकिंगला सुरुवात केली. मात्र, हे सर्वजण कलाकुंडच्या बगदारी धबधब्याजवळ पोहचल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला. जोरदार पावसामुळे धबधब्याचा पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे दीड तास हे गिर्यारोहक व पर्यटक त्याठिकाणी अडकून पडले होते.
मात्र, अशा परिस्थितीत घाबरून न जाता दीड तास नदी काठी विश्रांती घेतल्यानंतर या गिर्यारोहकांनी नदीच्या दोन्ही काठांवर दोरखंड बांधून सगळ्यांना सुखरूप बाहेर काढले.
या गिर्यारोहकांसोबत ट्रेकिंगला आलेले अनेक पर्यटक हे पहिल्यांदा आले होते. अशातच पूरस्थिती निर्माण झाल्याने पर्यटक काही काळ अस्वस्थ झाले होते. परंतु गिर्यारोहकांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढल्याने पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.