अमरावती : दिवसेंदिवस होत असलेल्या जंगलावरील अतिक्रमणांमुळे वन्यप्राण्याचा निवारा आणि खाद्य नष्ट होत असल्यामुळे या प्राण्यांनी आता मोर्चा गावांसह शहरांकडे वळविला आहे. तर पोटाची भूक शमविण्यासाठी प्रचंड मेहनत आणि कष्ट करावे लागते. माणसांसह प्राण्यांना सुद्धा हेच सूत्र लागू असून शोधात निघालेल्या माकडाच्या टोळीला, अंगणवाडी केंद्रासमोर असणाऱ्या कचरापेटीत भरपेट अन्नाची व्यवस्था आढळली आहे. या कचरापेटीत पोटपुजेसाठी माकडाचे आख्खे कुटुंबच ताव मरायला पोचले आहे. (Monkeys Food)
शाळा सुटल्यावर माकडांचीच मजा : बिहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात उच्च प्राथमिक शाळेसह अंगणवाडी केंद्र आहे. शाळेतील चिमुकल्यांना पोषण आहार मिळावा यासाठी शाळेच्या आवारात खिचडी शिजवली जाते. विद्यार्थ्यांनी पोटभर खिचडी खाल्ल्यावर अनेकदा हे विद्यार्थी उरलेली खिचडी शाळेच्या आवारात असलेल्या कचरापेटीमध्ये टाकतात. शाळा सुटल्यावर शाळेच्या परिसरात शुकशुकाट असताना माकडांची टोळी कचरापेटीमध्ये असलेल्या या अन्नावर ताव मारण्यासाठी तुटून पडते. शाळेच्या आवारात दिवसभर चिमुकल्यांचा किलबिलाट असताना शाळा सुटल्यावर मात्र शाळेच्या आवारात माकडांचीच मजा ही सुट्टीचा दिवस वगळता रोजच पाहायला मिळते. अन्न वाया जाण्याऐवजी माकडांच्या पोटात जाते असे समाधानी चित्र येथे नेहेमीच असते.
टोळीतील सर्वांनाच मिळते ताव मारण्याची संधी : खरंतर शाळेच्या आवारासमोर ठेवलेल्या या कचरापेटीत असणारे अन्न एकदम सर्वच माकडं एकाच वेळी खाऊ शकत नाही. यामुळे सर्वात आधी मोठे माकड कचरापेटीतील खिचडीसह इतर खाद्यपदार्थावर ताव मारतो. यानंतर लहान माकड आणि पिल्लं एक एक करून कचरापेटीतील अन्न फस्त करतात. शाळा सुटल्यावर माकडांचा हा नित्यक्रम असल्याचे शाळेच्या परिसरातील रहिवासी सांगतात. शाळेला सुट्टी असली की, या माकडांचा मात्र हिरमोड होतो.
हेही वाचा -