अमरावती - मुख्यमंत्र्यांना देशाचा वर्धापन दिवस कोणता आहे, याची माहिती स्वीय सहायकाकडून घ्यावी लागते ही लाजिरवाणी बाब आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य गैर नव्हते. मात्र शिवसेनेने राज्यभर जो धिंगाणा घातला, त्याचा निषेध केला तितका कमीच आहे. नारायण राणे यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका हुकूमशाही पद्धतीची आहे. आता उद्धव ठाकरे यांची हुकूमशाही संपविण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट हाच पर्याय असल्याचे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे असते तर कान पकडले असते -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असते तर देशाचा वर्धापन दिन ठाऊक नसणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे कान पकडून त्यांना नक्कीच समज दिला असता. आज मात्र उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसैनिकांना गुंडगिरी करण्याचे जे आदेश दिलेत ते निषेधार्ह असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.
हेही वाचा - करारा जवाब मिलेगा... नितेश राणेंचा इशारा!
शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले तरी कारवाई -
राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आंदोलन केले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तांना सांगून आम्हाला अटक करायला लावतात. ही हुकूमशाहीच आहे. नारायण राणे यांना जेवणाच्या तटावरून उचलून नेणे हा प्रकार पण हुकूमशाहिचाच आहे. राज्यातील महिला खासदारांविरोधात शिवसेनेचे खासदार अपशब्द वावरतात, शिवसैनिक गुंडगिरी करतात ही सर्व हुकूमशाही असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.