अमरावती - शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत व वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी काल आमदार रवी राणा यांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले. या प्रकरणी त्यांच्यासह १६ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने काल रात्री उशिरा आमदार रवी राणा यांच्यासह १६ कार्यकर्त्यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान कोरोनाचा काळ असल्याने मध्यवर्ती कारागृहाच्या विलगिकरण कक्षात रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना ठेवण्यात आले आहे. याविरोधात खासदार नवनित राणा यांनी मध्यवर्ती कारागृहाबाहेर आंदोलन सुरू केले आहे.
अतिरिक्त वीजबिलमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. यातच अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मदत व वीज बिल माफी करावी, यासाठी आमदार रवी यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन अमरावतीच्या गुरूकुंज मोझरी येथे रास्तारोको आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी आमदार राणांसह १६ कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर रात्री उशिरा आमदार रवी राणांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर तिवसा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. रात्री ११.३० च्या सुमारास तिवसा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
खासदार नवनीत राणाही आक्रमक -
अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी होत असताना मुख्यमंत्री दखल घेत नसल्याने शुक्रवारी मोझरी येथे आमदार रवी राणा यांनी आंदोलन केले होते. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली असताना आता खासदार नवनीत राणा यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून याविरोधात खासदार नवनित राणा यांनी मध्यवर्ती कारागृहाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. तसेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी त्या थेट मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांचे घर असणाऱ्या मातोश्रीसमोर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची भूमिका खासदार नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री काहीच बोलत नसून आम्हाला पण भेटत नाहीत. आता मात्र आम्ही शांत बसणारे नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आता भेट नाकारली तर मातोश्रीसमोर आंदोलन छेडणार, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला.