अमरावती - गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीवरून भातकुलीला करण्याचे आदेश शासनाने 25 नोव्हेंबरला दिले होते. आज आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांनी अमरावती येथील भातकुली तहसीलमधील साहित्य स्वतः बाहेर काढून ट्रकमध्ये भरून भातकुलीला घेऊन गेले. प्रशासनाचे काम राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणे हा गैरप्रकार आहे. तसेच याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. या प्रकारामुळे भातकुली तहसील परिसरात खळबळ उडाली.
गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील भातकुली तहसील कार्यालय हे अमरावती शहरातील कॅम्प परिसरात आहे. बडनेरा मतदारसंघात येणारे हे तहसील कार्यालय अमरावती येथून भातकुली येथे हलवण्यासाठी आमदार रवी राणा यांनी सर्वात आधी प्रयत्न केले. भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या 48 ग्रामपंचायतींपैकी केवळ 13 ग्रामपंचायतींसाठी भातकुली येथे तहसील कार्यालय सोईस्कर आहे, तर इतर 33 ग्रामपंचायतींना भातकुली तहसील कार्यालय अमरावती शहरात हवे आहे. भातकुली तहसील कार्यालय नेमकी कुठे व्हावे? यासंदर्भात 48 ग्रामपंचायतींना ठराव मागितला असता 33 ग्रामपंचायतींनी भातकुली तहसील अमरावती शहरात असणे ग्रामस्थांसाठी सोयीस्कर असल्याचा अहवाल दिला होता. असे असताना आता 25 नोव्हेंबरला शासनाने तडकाफडकी आदेश काढून भातकुली तहसील कार्यालय अमरावती येथून भातकुलीला स्तलांतरीत करण्याचे आदेश दिले.
हे वाचलं का? - महाराष्ट्रातील नवीन सरकार तमिळ लोकांच्या प्रगतीसाठी कार्य करेल
दरम्यान, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसह भाजपचे भातकुली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत राठी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता खासगी वाहन आणले. त्यामध्ये तहसील कार्यालयातील कागदपत्रे, कपाट, खुर्च्या असे साहित्य जबरदस्तीने भरून भातकुलीला नेले. हा प्रकार काँग्रेसचे भातकुली तालुका अध्यक्ष मुकद्दर पठाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी युवा स्वाभिमान आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना हटकले. असे असतानाही युवा स्वाभिमान आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी भातकुली तहसील कार्यालयातील तहसीलदार बळवंतराव अरखराव यांच्या खुर्चीसह इतर साहित्य वाहनात भरले. मुकद्दर पठाण यांनी वाहनात ठेवलेली तहसीलदारांची खुर्ची बाहेर काढून पुन्हा तहसीलदारांच्या दालनात ठेवली. युवा स्वाभिमान आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी इतर साहित्य मात्र खासगी वाहनांनी भरून भातकुलीच्या दिशेने निघून गेले.
हे वाचलं का? - उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री राज्याला मिळणे ही मोठी गोष्ट; उद्धव यांच्या आत्या करंदीकरांनी केले कौतुक
भातकुली तहसील स्थलांतरित करण्याचे आदेश शासनाने दिले असताना हे स्थानांतरण प्रशासनाच्यावतीने होणे अपेक्षित होते. मात्र, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रताप करणे चुकीचे असल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांच्या विरोधात प्रशासनाने पोलिसात तक्रार द्यावी, अशी मागणी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.
यासंदर्भात शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे तक्रार दिली. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.