अमरावती - देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी काही आठवड्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर दिली जात आहे. शहरांमध्ये लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटमधील चित्र जरा वेगळे आहे.
मेळघाटात आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. लसीकरणाबाबत त्यांच्यामध्ये विविध गैरसमज, अफवा, भीती आणि अंधश्रद्धा निर्माण झाली आहे. त्यामुळेच येथील अनेक गावातील आदिवासी बांधव हे लस टोचून घेण्यासाठी नकार देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मेळघाटात लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी मेळघाटच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी कंबर कसली आहे. त्या आता गावोगावी जाऊन कोरोनाविषयी जनजागृती व लसीकरणाचे महत्त्व आदिवासी बांधवांना त्यांच्याच कोरकू व आदिवासी भाषेत समजून सांगत आहे.
अमरावती जिल्ह्यात पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणावर कोरोनाने शिरकाव केला होता. मात्र, मेळघाटमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला नव्हता. मात्र, होळी सणानंतर मोठ्या प्रमाणावर मेळघाटमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे अनेक गावे प्रतिबंध क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाची लाट ओसरू लागल्याने लसीकरणावर ही मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. मेळघाटात लसीकरणाचीकडे लोक पाठ फिरवत असल्याचे दिसल्यानंतर प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्ह्याधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी काही कल्पक व्हिडिओ तयार करून ते सोशल माध्यमांवर वायरल केले. आदिवासी भागातील लोकाना सहज कळावे म्हणून कोरकू भाषेमध्ये लसीकरणाचे महत्त्व सांगितले जाते. तसेच लस का घ्यावी? त्याचे काय फायदे आहेत? हेदेखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले.
हेही वाचा - मेळघाटात कुठे पेरणी तर कुठे पेरणीपूर्वी मशागत सुरू
आदिवासी बांधवामधील गैरसमज -
आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहे. आरोग्य विभागाकडून करण्यात येणारे लसीकरण हे जीव घेण्यासाठी केल्या जात असल्याची भीती आदिवासी बांधवांंमध्ये आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेली लस आणि आदिवासींना देणारी लस ही वेगळी आहे. सोबतच ही लस कोरोना मुक्तीसाठी नाहीतर कोरोना होण्यासाठी दिली जात असल्याचा गैरसमजही त्यांच्यामध्ये आहे.
'कोरोना हारतीवा मेळघाट जितोवा' सीरिअल सुरू -
मार्चमध्ये लसीकरण सुरू केले तेव्हा लोकांमध्ये मोठे गैरसमज होते. ते दूर करण्यासाठी प्रकल्प अधिकारी डॉ मिताली सेठी यांनी कोरकू भाषेत 'कोरोना हारतीवा मेळघाट जितोवा' ही सीरिअल सुरू केली होती. या सीरिअलचा मोठा फायदा झाला आहे. त्यानंतर लोकांमधील गैरसमज हळूहळू दूर व्हायला लागले आहेत.
गावोगावी सरपंच यांच्या बैठका -
मेळघाटात लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी व अदिवासींमधील गैरसमज दूर करण्यासाठी गावागावातील सरपंच त्यांच्या बैठका लावण्यात आल्या. स्थानिक आदिवासी गावातील प्रमुख असणाऱ्या सरपंचांना मानतात. त्यामुळे आधी गावातील सरपंच व सदस्य यांना डॉ. मिताली सेठी यांनी लसीकरण करायला लावले. त्यामुळे लोकांनी प्रतिसाद दिला आहे. सोबतच रोजगार हमी योजनेच्या कामावरदेखील लसीकरण कॅम्प लावण्यात आले आहे. तेथे सरपंच यांच्यावतीने जनजागृती करण्यात आली.
हेही वाचा - Fathers Day Special : 123 बेवारस दिव्यांगांचे पालक शंकरबाबा पापळकर; 24 लेकरांचे केले थाटामाटात लग्न
मेळघाटात अशी आहे लसीकरणाची परिस्थिती -
अमरावतीच्या मेळघाटमध्ये चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांच्या समावेश आहे. यांमध्ये चिखलदरा तालुक्यात साडेसहा हजार लोकांचे लसीकरण तर धारणी तालुक्यात आठ हजारापर्यंत लोकांचे लसीकरण झाले आहेत. त्यामुळे 45 वर्षांवरील लोकांचे 23 टक्के हे लसीकरण संपूर्ण मेळघाटात झाले आहे. मेळघाटमध्ये जवळपास 350 गावे आहेत. त्यामुळे दररोज तीन ते चार कॅम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मेळघाटातील चार गावांमध्ये 100 टक्के लसीकरण -
एकीकडे मेळघाटमध्ये अनेक गावात लसीकरण संदर्भात लोकांमध्ये गैरसमज असले तरी याच मेळघाटामध्ये मात्र चार गावातील 45 वर्षांवरील नागरिकांचे 100% लसीकरण केले आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यातील टेम्बुरसुना आणि चिंचखेड या गावातील नागरिकांचे 100% लसीकरण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर चिचखेड येथील सरपंच यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधून त्यांचे कौतुकही केले होते.