अमरावती - फक्त दाढी वाढवून कोणी रवींद्रनाथ टागोर होऊ शकत नाही. तसे हृदयही विशाल असावे लागते, परंतु ते आपल्या पंतप्रधानांजवळ नाही, अशी बोचरी टीका राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या.
अटक करून काय सिद्ध करता-
सध्या देशभरात काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकाने आणलेल्या नवीन तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. दिल्ली सीमेवरही पंजाब हरियाणामधील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशातील दोन कोटी नागरिकांच्या सह्या घेऊन राष्ट्रपती यांच्याकडे दिल्या आहेत. त्या दरम्यान दिल्ली सीमेवर आंदोलकांना भेटायला गेलेल्या प्रियंका गांधीना पोलिसांनी अटक केली, यातून तुम्ही काय सिद्ध करता? असा सवालही यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
आम्हाला घाबरता म्हणून पोलिसांना पुढे करता-
विरोधकांना बोलू दिले पाहिजे. देशातील नागरिकांचा जो आवाज आहे, तो पंतप्रधानांनी ऐकला पाहिजे. नव्या कृषी कायद्याला विरोध करत दोन कोटी लोकांनी सह्या करत अर्ज दाखल केले. तसेच या कायद्या विरोधात हजारो शेतकरी एवढ्या दिवसापासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. मग आणखी तुम्हाला काय पाहिजे? असा प्रश्नही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे, पण तुम्ही आम्हाला घाबरता म्हणून पोलिसांना पुढे करता, अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
हेही वाचा- रजनीकांत हैदराबादच्या अपोलोमध्ये भरती, रुग्णालयाचा खुलासा