अमरावती - आतापर्यंत देशात साडे तीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. पण शेतकऱ्यांच्या एवढ्याही आत्महत्या होऊन शासन आणि प्रशासनात काही बदल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो तुम्ही आत्महत्या करून मरू नका. लढा, नाहीतर मारा आणि ते तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा, असा अजब सल्लाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी संत्रा व्यापाऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे आणि पोलिसांनी मारहाण केल्याने अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे न्यायाची मागणी करत चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. त्यामुळे आज बच्चू कडू यांनी या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना मारहाण करण्याचा अजब सल्ला दिला आहे. कडू म्हणाले, की मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की एकदम आत्महत्येचा विचार न करता गावातील पोलीस पाटील, सरपंच यांना विश्वासात घेतले पाहिजे. आत्महत्या हा त्यावरचा मार्ग नाही, असेही कडू म्हणाले.