अमरावती - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विविध मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाकडून छापे टाकण्यात आले. सरनाईक यांच्या मुलाची चौकशी सुरू आहे. त्यावर भाजप राजकारण करून जाणीवपूर्वक ईडीच्या चौकशी लावत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही टीका केली. तुम्ही अनेकांची ईडी चौकशी लावली, परंतु भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहेत का? राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांची ईडीने चौकशी केल्यास मोठे घबाड उघडकीस येईल, असेही कडू म्हणाले.
राज्यात आतापर्यंत शरद पवार, राज ठाकरे आता प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची चौकशी लावली आहे. भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर संपती गोळा केली असून सुद्धा एकाही भाजप नेत्यांवर ईडीची चौकशी लागत नाही. तुम्ही पक्षपातीपणा करत नाही तर मग भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
बोलेल त्याचा आवाज दाबण्याचे काम सुरू
जो बोलले, आवाज उठवेल, त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाहीत घटनेची पायमल्ली करण्याचे काम केंद्र सरकारकडून होत असल्याचा गंभीर आरोप कडू यांनी केला. महाराष्ट्रत लोकशाहीला पूरक अशी परिस्थिती निर्माण करण्याचे कुठलेही काम केंद्र सरकारकडून होत नाही. अतिशय जुलमी पध्दतीने घटनेची पायमल्ली केली जात आहे. जो बोलणार त्याचा गळा दाबणार असे काम केंद्र सरकारकडून होत आहे, असेही कडू म्हणाले.