अमरावती - अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील आणि बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील देऊरवाडा येथील विजय सुने हा शेतकरी आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी शेतकऱ्याच्या पत्नीने आपल्या पतीने आत्महत्या केल्यास चिठ्ठीत लिहिलेल्या नावांसह थेट राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी राज्यमंत्री कडू यांनी आपला या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या चिठ्ठीशी संबंध नसल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
संबंधित शेतकऱ्याने या चिठ्ठीमध्ये त्यांच्या शेतामधून बळजबरीने रस्ता मागितला जात असल्याचे लिहिले आहे. तसेच, यामध्ये शिरजगाव कसबाचे ठाणेदार, बीट जमादार व तहसीलदार यांची नावे लिहिली आहेत. हे सर्वजण शेतातून रस्ता देण्यासाठी धमकावत असल्याचे शेतकऱ्याचे म्हटले आहे. या प्रकरणी शेतकऱ्याच्या पत्नीने आपल्या पतीने आत्महत्या केल्यास त्यासाठी ठाणेदार, बीट जमादार, तहसीलदार, राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांचे खाजगी स्वीय सहायक दीपक भोंगाळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - सोनू सूद सवयीचा अपराधी, बीएमसीचा उच्च न्यायालयात आरोप
बच्चू कडूंचे शेतकऱ्याला आवाहन
या संपूर्ण प्रकरणावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच, या प्रकरणात आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 'शेतकऱ्याने चिठ्ठीत आमचे नाव लिहिले नाही. माझी बदनामी करण्याचा हा डाव आहे,' असे बच्चू कडू यांनी सांगितले. 'आम्ही चुकीचे काही केले असेल तर, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. मात्र, आपण कुठे गेले आहात? आपण सुखरूप घरी यावे,' अशी विनंती बच्चू कडू यांनी बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याला केली आहे.
पत्नीने काय म्हटले आहे तक्रारीत
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील देउरवाडा येथील विजय सुने या शेतकऱ्याचे ८० आर शेत आहे. या शेतातून कुठलाही रस्ता नसल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. तरी आपल्या पतीला शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परदेशी व बीट जमादार हे रस्ता लिहून देण्याच्या मागणीसाठी वारंवार पोलीस ठाण्याला बोलावत होते. मात्र, असे करण्यास नकार दिल्याने पोलीस घरी येऊन दमदाटी करत असल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. तहसीलदार, पोलीस निरीक्षक, बीट जमादार यांच्या वागणुकीला त्रस्त होऊन आपल्या पतीने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला असल्याचे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. बेपत्ता होण्यापूर्वी या शेतकऱ्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
शेतकऱ्याने काय लिहिले आहे चिठ्ठीत
काही दिवसांपूर्वी तहसीलदार यांनी माझ्या मागे काढलेला आदेश माझे नुकसान करणार आहे. या आदेशामुळे माझी मानसिकता खूप खराब झाली आहे. गेल्या ५-६ दिवसापासून पोलिसांनी मला फोन करून धमकावले आहे. त्यामुळे मी पूर्णपणे हरलो आहे. त्यामुळे मी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने घर सोडून जात आहे, असे चिठ्ठीत लिहिले आहे.
हेही वाचा - मोदीजी सोबत असून जमत नाही तर..; आ. राणांचा खा. नवनीत राणांना मिश्किल टोला