अमरावती - बँकेचे अधिकारी व कर्मचारी आदिवासींना त्रास देतात. तसेच तासनतास रांगेत उभे ठेवतात; या प्रकारच्या तक्रारी अनेक दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या. याबाबत माहिती घेण्यासाठी नवनीत राणा स्वत: बँकेत पोहोचल्या.
खासदार नवनीत राणा मेळघाटातील चुरणी गावाच्या दौऱ्यावर असताना या ठिकाणी बँकेबाहेर लोकांची रांग लागली होती. हे पाहून त्या थांबल्या. त्यांनी सर्वसामान्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी खात्यातील जमा रकमेची माहिती घ्यायची असल्यास बँक कर्मचारी दिरंगाई करत असल्याचे त्यांच्या कानावर आले. तसेच किरकोळ कामांसाठी अनेकदा चकरा माराव्या लागत असल्याचे त्यांना कळले.
याबाबत नवनीत राणांनी बँक कर्मचाऱ्यांना विचारपूस केली. यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने राणा चांगल्याच संतापल्या. राग अनावर झाल्याने पाच वाजेपर्यंत याच ठिकाणी थांबत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 'समाधानकार उत्तर न मिळाल्यास बँक फोडून टाकू', असा इशारा त्यांनी दिला.