अमरावती : मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या धामणगाव गढी या गावात रमेश जोशी यांनी 1987-88 या काळात उदरनिर्वाहासाठी एका कडूनिंबाच्या झाडाखली मोटर मॅकेनिक म्हणून काम सुरू केले. हे काम एक-दोन वर्षे केल्यावर या परिसरात सुरू असलेल्या धरणाच्या कामावर दक्षिण भारतातून आलेल्या रेड्डी नावाच्या कंत्राटदाराने मोटर मॅकेनिकपेक्षा पंक्चर काढण्याचे काम करण्यास जोशी यांना सुचविले. कडूनिंबाच्या झाडाखाली जोशी पंचर काढण्याचे दुरुस्तीचे काम करू लागले. झाडाच्या सावलीमुळे त्यांना कधी कामाचा थकवा जाणवला नाही. एका झाडामुळे शांतता आणि सुख मिळाले तर हे सुख इतरांना देखील कळावे, मिळावे हा विचार मनात आला. तेव्हापासून ते झाडांच्या कलम बनविण्याचे तंत्र अवगत करून रोप निर्मितीकडे वळले, असे रमेश जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
साकारली रोपवाटिका : रमेश जोशी यांनी तयार केलेली रोपे लगतच्या जंगल परिसरात लावण्यास सुरुवात केली. त्यांनी बनविलेल्या विविध झाडांच्या कलमांना लोकांकडून देखील मागणी व्हायला लागली. यामुळे रस्त्यालगतच्या जागेवर छोटेखानी रोपवाटिका साकारली. 2004 मध्ये त्यांनी पूर्णतः स्वतःला या रोपवाटिकेत वाहून घेतले.
दुर्मिळ वृक्षांचा खजिना: आज रमेश जोशी यांच्या रोपवाटिकेत दुर्मीळ अशा औषधी वनस्पतींसह विविध वृक्षांच्या रोपांचा खजिना आहे. या सर्व वृक्षांची रोप ते स्वतः तयार करतात. सध्या शमीची रोप या रोपवाटिकेत तयार करण्यात आली आहेत. यासह खंडू चक्क, त्रिफळा, आवळा, बिहाडा, राजफुल, ताम्हण, जारूळ या वृक्षांची रोपे उपलब्ध आहेत. भरपूर प्राणवायू देणारी वड, पिंपळ, उंबर या वृक्षांची देखील स्वतंत्र रोपवाटिका आहे. दुर्मीळ असे सिताअशोक, पांढरा जांभूळ, चक्री आवळा, बेल, कविठ, शेवगा, बहवा, भुत्या, कपूर, रुद्राक्ष, सोनचाफा, अनंत, गुलाब, रातराणी, दिन का राजा, सोनटक्का, पुत्रजीवा, महागणी, मोहा, चारोळी, आंबा, चिकू, सीताफळ, पपई, सफरचंद, द्राक्ष अशा वृक्षांची रोपे जोशी यांच्या रोपवाटिकेत उपलब्ध आहेत.
रोपांना विदर्भातून मागणी: विदर्भात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ या भागातून अनेक वृक्षप्रेमी दुर्मिळ अशा वृक्षांची रोपे त्यांच्याकडून नेतात. औरंगाबाद, जळगाव, नाशिक या भागातून देखील वनौषधीयुक्त वृक्षांच्या रोपांना मागणी असल्याचे रमेश जोशी म्हणाले.
मुलगा वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर: आपले संपूर्ण आयुष्य मेळघाटातील विविध औषधी वनस्पती आणि महत्त्वपूर्ण वृक्षांची रोपे घडविण्यासाठी झटणारे रमेश जोशी यांचा मुलगा चेतन याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. तो आपल्या वडिलांच्या रोपवाटिकेत विविध प्रयोग करायला लागल्यामुळे जोशी यांच्या रोपवाटिकेत नवे चैतन्य निर्माण झाले आहे.
परिसरात पक्षांचा किलबिलाट: रमेश जोशी यांच्या रोपवाटिकेत विविध प्रजातींचे रोप असून हा संपूर्ण परिसर अनेक वृक्षांनी बहरला आले. याठिकाणी पक्षांचा किलबिलाट देखील भरपूर वाढला आहे. या पक्षांना पिण्याचे पाणी आणि त्यांना हवे ते खाद्य जोशी यांनी उपलब्ध करून दिले आहे. यासह मेळघाटात येणारे पर्यटक, शासकीय कर्मचारी, आदिवासी बांधव यांची तहान भागविण्यासाठी रमेश जोशी यांनी बारमाही पाणपोईची व्यवस्था देखील केली आहे.
हेही वाचा: