अमरावती : Moha Tree In Melghat: सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटच्या जंगलात राहणारे आदिवासी बांधव (Adivasi In Melghat) शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार, मोहाची दारू काढून ती पिणे आणि बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना विकणे यात समाधान मानत होते. आता मात्र मोहाचे अतिशय उपयुक्त औषधी गुण समोर आले आहेत. मोहापासून औषधी पदार्थ तयार व्हायला लागले आहेत. शासनाच्या पुढाकाराने मेळघाटातील आदिवासी बांधवांना देखील मोहाच्या माध्यमातून विकासाचा नवा मार्ग आता गवसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चिखलदरालगत 'शिवस्फूर्ती प्रोसेसिंग फाउंडेशन'च्या माध्यमातून मोहासह जंगलातील विविध फळाफुलांवर विविध प्रक्रिया आणि प्रयोग होत आहेत. याच प्रयोगाचा भाग म्हणून तयार करण्यात आलेले 'महुआ राब' (Mahua) हे एकूण 45 आजारांवर गुणकारी आहे.
महुआ राबद्वारे 45 आजारांवर इलाज : मोहाचे आता अनेक पदार्थ बनायला लागले आहे. मोहाचे लाडू, कॅंडी बाजारात उपलब्ध व्हायला लागले आहे. मोहापासून तयार करण्यात आलेला 'महूआ राब' हा सुमारे 45 आजारांवर मात करणारा अतिशय उपयुक्त औषधी पदार्थ (Benefits of Moha Tree In Melghat) आहे. भारतीय जनजातीय सहकारी विपणन विकास परिसंघ अर्थात ट्रायफ्रेडने याला मानांकित करून स्पेशल कोड देखील दिला आहे. महुआ राबचा उपयोग पोटातील सर्व प्रकारचे विकार, नेत्र विकार, हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव, डायबेटीस यावर महुआ राब हे अतिशय गुणकारी औषध आहे. यासह महुआ राब हा वात आणि पित्तनाशक असून त्वचारोगासाठी अतिशय प्रभावी औषध आहे. शक्तिवर्धक आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे गुण यात आहेत. जुना खोकला, सर्दीवर उपाय म्हणून देखील उपयुक्त आहेत. तसंच महिलांची मासिक पाळी सुरळीत ठेवण्यासाठी देखील फायदेशीर असून गुडघेदुखी तसेच हाडांच्या विकारांवर महुआ राब हा अतिशय रामबाण इलाज आहे. स्तनदा मातांसाठी देखील महुआ राब हा एखाद्या वरदाना इतकाच महत्त्वाचा असल्याची माहिती, 'शिवस्फूर्ती फाउंडेशन'चे संचालक कैलाश भालेराव यांनी दिली.
मोहाचे तेलही आहे बहुगुणी : मोहाच्या बियांपासून खादी ग्रामोद्योग विभागाच्या मार्गदर्शनात मेळघाटात मोहाचे तेल (Moha oil) देखील तयार करण्यात आलं आहे. लाल मुंग्या किंवा इतर कोणताही किडा चावला, तर हे तेल लावल्यावर वेदना कमी होतात. डोकेदुखीवर उपाय म्हणूनदेखील मोहाचं तेल गुणकारी आहे. यासह त्वचारोग, खरुज, सोरायसिस, चेहऱ्यावरील डाग यांचा नायनाट करण्यासाठी मोहाचं तेल हे गुणकारी आहे. आदिवासी विभाग आणि खादी ग्रामोद्योग विभागाद्वारे मोहाचं तेल काढण्याचं निःशुल्क प्रशिक्षण आदिवासी बांधवांना दिलं जातं.
महिला होत आहेत प्रशिक्षित : मोहापासून अनेक औषधी पदार्थ तयार केले जातात. चिखलदरालगत आमझरी येथे खादी व ग्रामोद्योग विभागाच्या सहकार्याने स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून महिलांना मोहाचे विविध पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या ठिकाणी मोहा राबसह मोहाचे एकूण बारा पदार्थ करण्याचं प्रशिक्षण मेळघाटातील अनेक महिला बचत गटांना देत आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आतापर्यंत 500 महिलांना निःशुल्क प्रशिक्षण देण्यात आलं आहे. अनेक वर्षांच्या परंपरेपासून मेळघाटातील आदिवासी बांधव बाळाचा जन्म असो किंवा लग्नकार्य आणि विविध सण, उत्सव यामध्ये मोहा आणि मोहाच्या फुलाला अतिशय महत्त्व देतात. आता आपल्या मोहाचे पदार्थ मेळघाटच्या बाहेर जावेत यासाठी मोहाचे लाडू, चॉकलेट, केक गुलाबजाम असे अनेक पदार्थ तयार केले जात आहे. खादी व ग्रामोद्योग विभाग आणि वन विभागाच्या सहकार्याने येत्या काळात मेळघाटातील मोहाच्या औषधी गुण असणाऱ्या पदार्थांच्या विक्रीसाठी खास मॉल उभारण्याचे प्रयत्न शासनाच्या वतीने सुरू झाले आहेत. अशी माहिती स्फूर्ती क्लस्टरचे सचिव सुनील भालेराव यांनी दिली.
पॅकेजिंग आणि मार्केटिंगची समस्या : मेळघाटातील आदिवासी बांधव मोहासह मध, कॉफी, दुधाचे पदार्थ यांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायला लागले आहे. मात्र मेळघाटात मोहाच्या आणि इतर पदार्थांचे मार्केटिंग हवं तसं झालेलं नाही. मालाच्या पॅकेजिंगचाही मोठा प्रश्न आहे. या सर्व अडचणीत संदर्भात येत्या पंधरा दिवसात योग्य तोडगा काढला जाणार आहे. आदिवासी बांधवांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची माहिती आदिवासी विभागाचे प्रकल्प प्रमुख रिचर्ड अँथम यांनी दिली.
हेही वाचा -