अमरावती - वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्याविरोधात तक्रार घेऊन आज (१९ मार्च) मांगीयावासी आदिवासींचा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. मेळघाटातील मांगीया गावातील ग्रामस्थांना गाव सोडून जाण्यासाठी धमकावल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर करण्यात आला.
मेळघाटातील अनेक गावांपैकी मांगीया गावाचे पुनर्वसन ग्रामस्थांच्या मर्जीने करण्याचे आदेश व्याघ्र प्रकल्पाने काढले आहे. या गावातील अनेकांनी शासनाकडून मोबदला घेऊन गाव सोडले आहे. मात्र, अनेकांनी आम्ही आमचे गाव सोडून जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, हरिसाल येथील वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी मांगीया गावात जाऊन ग्रामस्थांना त्वरित गाव रिकामे करण्यास सांगितले. ग्रामस्थांनी नकार देताच दीपाली चव्हाण यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रार दिली असता पोलिसांनी त्यांची तक्रार धुडकावून लावली. त्यामुळे आज मांगीया ग्रामस्थांचा मोर्चा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांना भेटण्यासाठी आला होता. पोलीस अधीक्षकांनी मांगीयावासीयांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.