अमरावती - शेजारी राहणाऱ्या विवाहित व्यक्तीने विवाहित शेजारणीलाच पळवून नेले. आपला स्वतःचा संसार सोडून दोघांनाही आता एकमेकांसोबत आयुष्य काढायचं आहे. दोघांनाही असणारे दोन लहान मुलं त्यांचा विचार करा, झालं गेलं विसरून जा, आपापल्या संसाराकडे दोघांनीही बघा, अशा स्वरुपात दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न करताना पोलीस आणि दोघांचेही कुटुंबीय हैराण झाले आहेत. काहीही झाले तरी आम्हाला आता सोबतच राहायचे आहे, अन्यथा आम्ही आत्महत्या करू, अशी टोकाची भूमिका दोघांनी घेतल्याने त्यांची समजूत काढणारे सारेच हतबल झाले आहेत.
हेही वाचा - पीक विम्याच्या तुटपंज्या मदतीने शेकऱ्यांमध्ये नाराजी
अमरावती शहरातील मुदलियार नगर परिसरात सतीश चिंचोळकर हा व्यक्ती मागील दोन वर्षांपासून पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहायला आला होता. चिंचोळकर यांच्या शेजारीच राहणाऱ्या एका कुटुंबासोबत त्यांचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. या मैत्रीतून सतीश चिंचोळकर आणि त्यांच्या शेजारणीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. सतीश हा दुसऱ्याच्या पानटपरीवर काम करतो. त्याला दोन मुलं आहेत. सतीशच्या शेजारणीलाही दोन लहान मुली असून शेजारणीचा नवरा हा एका शाळेत चपराशी म्हणून नोकरीवर आहे.
हेही वाचा - भातकुली येथे वार्षिक रथयात्रा महोत्सव, आदिनाथ स्वामी दिगंबर जैन संस्थानाचे आयोजन
पंधरा दिवसांपूर्वी सतीश चिंचोळकर हा शेजारणीसह पळून गेला. पत्नी घरातून निघून गेल्यामुळे तिच्या पतीने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तर, सतीश चिंचोळकरच्या कुटुंबानेसुद्धा सतीश घरी परतला नसल्याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी विषयाचे गांभीर्य ओळखून दोघांचाही शोध घेण्यास सुरुवात केली. ते दोघेही मुंबईला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सतीश हा त्याच्या शेजारणीसोबत अमरावतीत परतताच सतीशला मारहाण करण्यात आली. यानंतर पोलिसांनी सतीश आणि त्यासोबत पळालेल्या शेजारणीला पोलीस स्टेशनला आणले. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्यासह नगरसेवक बंडू हिवसे आणि माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर यांच्यासह दोघांच्याही कुटुंबीयांनी दोघांचीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
शेजारणीने काहीही झाले तरी मला सतीशसोबतच राहायचे, असा ठाम निर्णय पोलिसांसमोर जाहीर केला. हा निर्णय स्पष्ट करतानाच मला माझ्या मुलींना जेव्हा भेटावसं वाटेल तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्या मुलींना मला भेटू द्यावे, अशी अटही शेजारणीने घातली. पत्नी ऐकायला तयार नसल्यामुळे शेजारणीच्या पतीनेसुद्धा आता ही माझ्या घरात नको, असे स्पष्टपणे पोलिसांना सांगितले. सतीशने माझी सर्व संपत्ती मुलांच्या आणि पत्नीच्या नावे करणार आहे आणि मी शेजारणीसोबत राहणार असे पोलिसांना सांगितले. सतीशच्या पत्नीने मला पतीसोबतच राहायचे आहे. मात्र, ती आमच्या घरात नको, अशी भूमिका घेतली. माझा नवरा आम्हाला सोडून दुसरीकडे राहत असेल तर हरकत नाही. मात्र, मुलांच्या पोषणासाठी, शिक्षणासाठी त्याने पैसे द्यावे, असे सतीशच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणात चिंचोळकर आणि त्याची प्रेयसी असणारी शेजारीण काही ऐकायला तयार नसल्याने पोलिसांसह दोघांच्याही कुटुंबीयांनी हतबल होऊन त्या दोघांना जे काही करायचे ते करु द्या, अशी भूमिका घेतल्याची चर्चा परिसरात आहे.