अमरावती : गेल्या वर्षापासून मानव आणि वन्यजीव प्राण्यांमधील संघर्ष वाढत चालला आहे. जंगल परिसरात मानवी वस्ती वाढायला लागली आहे. त्यामुळे जंगली श्वापदं हे मानवी वस्तीत यायला लागल्यानं वन्य प्राण्यांचे मानवावर होणारे हल्ले वाढले आहेत. गंभीर बाब म्हणजे वर्षभरात वाघ, बिबट्या, हत्ती आणि इतर प्राण्यांच्या हल्ल्यात एकूण शंभर जणांनी प्राण गमावलेत. वन्य प्राण्यांनी वर्षभरात 7 हजार 21 पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे. यासोबतच गेल्या चार ते पाच वर्षात वन्य प्राण्यांनी शेतीचंदेखील प्रचंड नुकसान केलं आहे.
वाघांचे हल्ले वाढले, बिबट्याचीही भीती : महाराष्ट्रात मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये मानव आणि वन्यजीव फारसा संघर्ष नाही. मात्र गडचिरोली, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर या भागात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांनी मनुष्यावर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेष म्हणजे वाघांच्या हल्ल्याच्या घटना या सर्वाधिक असून गत वर्षभरात वाघांनी हल्ला केल्याच्या घटनेत 76 जण दगावले आहेत. बिबट्यानं वर्षभरात केलेल्या हल्ल्यांमध्ये एकूण 14 जणांनी प्राण गमावले आहेत. तर हत्तीनं केलेल्या हल्ल्यामध्ये तीन जण दगावल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत.
पशुधनाची मोठी हानी : गाय, म्हैस, शेळी, मेंढी अशा पशुधनाची वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात प्रचंड हानी होत आहे. गत वर्षभरात वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात एकूण 7 हजार 21 पाळीव प्राणी दगावले आहेत. तर 522 जखमी झाले आहेत. 2019 ते 2020 नंतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात पशुधनाची हानी वाढली आहे.
शासनाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा : मानव वन्यजीव संघर्षाचे प्रमाण वाढत असताना असताना राज्य सरकारने 14 ऑगस्ट रोजी महत्त्वाचा शासन निर्णय पारित केला आहे. या शासन निर्णयानुसार वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा जीव गेला, तर त्याच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तर वन्य प्राण्यांनी पाळीव प्राण्यांची शिकार केली तर नुकसान भरपाई यासह वन्य प्राण्यांकडून शेतीचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानीचा पूर्ण मोबदला दिला जाणार आहे. या निर्णयामुळे जंगल भागात राहणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.
शासनाच्यावतीनं वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. असे असले तरी आयुष्य अधिक महत्त्वाचं असल्यानं जंगलात जाताना सर्वांनी नियमाचं पालन करावे- असं वन्यजीव अभ्यासक यादव तरटे
वन्य प्राण्यांपासून बचावासाठी अशी घ्यावी कळजी : वन्यजीव अभ्यासक यादव तरटे म्हणाले, जंगलामध्ये अगदी पहाटे आणि सायंकाळी जाऊ नये. जंगलात एकटं न जाता समूहानं जावे. जंगलामध्ये वन्य प्राण्यांचा आवाज ऐकू येत असेल तर पुढे जाऊ नये. शारीरिकदृष्ट्या अशक्त व्यक्तींनी देखील जंगलात जाण्याचं धाडस करू नये. ज्या भागात बिबट्याचा अधिवास आहे, अशा भागात वृक्षतोड, शिकार आणि अवैध प्रवेश करणं टाळावं. जंगलाला लागून असलेल्या नागरी वसाहतीमध्ये पाळीव प्राणी हे बंदिस्त गोठ्यात ठेवावेत. शक्यतोवर रात्री शेतात जाऊ नये. अगदीच गरज भासली तर घुंगराची काठी, टॉर्च आणि रेडिओ सोबत ठेवावा, असे देखील यादव तरटे यांनी सांगितले.
हेही वाचा -