अमरावती - अभ्यास असो किंवा नृत्य असो तसेच रोजचे खेळणे बागडणे मस्ती अशा सर्वच आघाड्यांवर नियमित योगासने ( Yoga By Children In Amravati ) करणाऱ्या चिमुकल्यामध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. रोज सकाळी उशिरा उठणारी मुले योगामुळे पहाटेच उठून आपल्या गोड चेहऱ्यांनी घरातले तसेच परिसरातील वातावरण प्रफुल्लीत करीत आहेत. योगाचा ध्यास लागला आणि सारेच बदलले, असेच चिमुकल्यांचे त्यांची शिक्षकही आता म्हणायला लागले आहेत.
नृत्याचे धडे मात्र योगालाच महत्त्व - अमरावती शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षक असणारे भरत मोंडे हे विद्यार्थ्यांना नृत्याचेही धडे देतात. चिमुकल्यांनी नृत्य शिकण्यापूर्वी सुरुवातीला नियमित पंधरा मिनिटे तरी योगासन करावे असा दंडक भरत मोंडे यांनी घातला. सूर्यनमस्कार प्राणायाम यासह योगासनातील सर्व प्रकार हळूहळू चिमुकल्यांनी आत्मसात केले. आता तर नृत्यापेक्षा चिमुकले योगसाधनेतच अधिक रमायला लागले आहेत. खरंतर योगा केल्यामुळे आमच्या वर्गातले विद्यार्थी नृत्य सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने शिकत असून त्यांच्या इतर अॅक्टिव्हिटी सुद्धा उत्तम होत असल्याचे भरत मोंडे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. गत सहा वर्षांपासून नृत्याचे धडे द्यायला सुरुवात केली असताना वर्षभरातच म्हणजे पाच वर्षांपूर्वी आम्ही आमच्याकडे नृत्य शिकायला येणाऱ्या चिमुकल्यांना योगा सुद्धा शिकवायला लागलो. वर्षभरात जो परिणाम आम्हाला जाणवला नाही तो योगा सुरू केल्यावर अवघ्या तीन ते चार महिन्यात दिसायला लागला. मुलांमध्ये वाढलेली सकारात्मक वृत्ती पाहून चिमुकल्यांचे पालक सुद्धा नृत्यासोबतच त्यांच्या पाल्यांना आणि आम्हाला सुद्धा योगासनाचे धडे देण्यास प्रोत्साहित करीत असल्याचे भरत मोंडे म्हणाले.
योगा बाबत चिमुकल्या मध्ये उत्साह - आम्ही ज्या दिवसापासून योगासने शिकायला लागलो त्या दिवशीपासून एक नवा उत्साह आमच्यामध्ये संचारला आहे. सुरुवातीला काही आसने करताना त्रास व्हायचा. मात्र, आता आम्ही सहज योगासने करतो. आमच्यासोबत असणारी अतिशय लहान मुले सुद्धा आता हळूहळू योगासने शिकायला लागली आहेत. आम्ही आता सर्व एकत्रित येऊन योगाच्या माध्यमातून पिऱ्यामिड सुद्धा उभा करू शकतो. नियमित योगा करणे हा आमचा नित्यक्रम झाला असून खरे सांगायचे तर योगासन केल्यापासून आम्ही कधी आजारीच पडलो नाही, अशी प्रतिक्रिया राजवी तोटे, दिशा खंडारे या चिमुकल्यांनी 'ईटीवी भारत' शी बोलताना नोंदविली.
प्रत्येक शाळेत व्हावेत योगा वर्ग - आजच्या धकाधकीच्या आणि तणावाच्या जगण्यात योगा हा अतिशय महत्त्वाचा आहे. आज चिमुकले सुद्धा अनेकदा तणावात दिसतात. तणावमुक्त आणि निरोगी जीवनासाठी योगासन अतिशय महत्त्वाचे असून आता तर प्रत्येक शाळेत योगा वर्ग असायला हवेत, असे योगाचे धडे देणाऱ्या प्रिती मोंडे म्हणाल्या.
निसर्गाच्या सानिध्यात योगा - वर्ग खोल्यांमध्ये चिमुकल्यांना नियमित योगासने शिकविले जातात. मात्र, अधूनमधून आणि निसर्गाच्या सानिध्यात येऊन चिमुकल्या सोबत योगासने करतो. निसर्गाच्या सानिध्यात योगासने करण्याचा आनंद आणि उत्साह काही औरच आहे, असे भारत मोंडे म्हणाले. चिमुकल्यासोबत त्यांच्या पालकांना देखील आता योगासनाबाबत आकर्षण निर्माण होते आहे. आमच्या वर्गातले अनेक चिमुकले आपल्या पालकांसोबत आता घरी देखील योगासने करायला लागली आहेत, याचा आनंद होत असल्याचे भरत मोंडे यांनी सांगितले.