अमरावती : Leopard strays into Amravati बुधवारी सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास दूध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या चिमुकली समोर अचानक बिबट्या आल्यावर ती किंचाळली. येथून सुरू झालेला बिबट्याचा थरार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत कायम होता. वनविभागानं बिबट्याला या परिसरातून पकडण्याचा तसेच बाहेर काढण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर सायंकाळी अंधार पडताच अमरावती शहरातील विलास नगर, छाया नगर परिसरात प्रचंड शुकशुकाट पसरला. वनविभागाच्यावतीनं रात्रभर या बिबट्यावर नजर ठेवण्यात आली. या भागातील रहदारीचा मुख्य मार्ग पोलिसांनी बंद केला. बिबट्या आपल्या घरात तर येणार नाही या भीतीनं परिसरातील प्रत्येक घराचं दार हे सायंकाळी सहा वाजल्यापासूनच बंद झालं होतं. या परिसरातून बिबट्या बाहेर पडावा यासाठी वनविभागाच्या पथकाकडून प्रयत्न सुरू असताना रात्री दीड वाजता त्यांना यश आले. हा बिबट्या विलास नगर परिसरातून विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरात शिरला.
सुरक्षेसाठी तरुण रस्त्यावर : बुधवारी दिवसभर बिबटला पकडण्यासाठी वनविभागाच्यावतीनं प्रयत्न सुरू असताना परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी बिबट्या असलेल्या ठिकाणी उसळी होती. गर्दी आणि गोंधळामुळे बिबट्या प्रचंड बिथरला. दिवसभर बिबट्या म्हणजे मनोरंजन समजणाऱ्या नागरिकांना सायंकाळी अंधार पडायला लागताच बिबट्याची भीती वाटायला लागली. परिसरात सायंकाळी साडेसहा ते सात दरम्यान प्रचंड शुकशुकाट पसरला. दरम्यान बिबट्या कधीही कोणत्याही घरात देखील शिरू शकतो अशी शक्यता असल्यामुळं परिसरातील काही तरुणांनी ज्या काही घरांची दारं उघडी दिसतील ती बंद करण्याचं आवाहन नागरिकांना केलं. यासह सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या परिसरातील रहिवाशांनादेखील कुठल्या रस्त्यानं घराकडं जायचं या संदर्भात मार्गदर्शन केलं. वनविभागाच्यावतीनं आतमधल्या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तरुणांनी हातात काठ्या घेऊन या रस्त्यावरून कोणीही जाऊ नये, याची दक्षता घेण्यात आली.
गोठ्यात रात्री गाई बांधल्या नाही : विलासनगर परिसरात असणाऱ्या मणिपूर लेआउट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडूप वाढले आहे. बिबट्या दिवसभर याच भागात होता. सायंकाळी पाच नंतर तो याच ठिकाणी असणाऱ्या नाल्यात दडून बसला होता. मणिपूर लेआउट परिसरात राहणारे सतीश राऊत यांनी रात्री आठ वाजता आपल्याकडे असणाऱ्या गाईंचे दूध काढून दोन्ही गाईंना मोकळे सोडून दिले आणि बछड्याला घरात नेऊन ठेवले. गाई मोकळ्या असल्या की त्या स्वतःच्या सुरक्षेसाठी कुठेही पळू शकतात. त्यांना गोठ्यात बांधून ठेवणे योग्य नाही असे सतीश राऊत 'ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. परिसरातील अनेक चिमुकले सायंकाळी शिकवणी वर्गालादेखील दोन दिवसांपासून जात नाहीत. सायंकाळी सहा नंतर घराच्या बाहेर पडण्याची कोणाची हिंमत नाही, अशी परिस्थिती सध्या विलास नगरसह मणिपूर लेआउट प्रवीण नगर छाया नगर, आणि पाठ्यपुस्तक मंडळ परिसरातील रहिवाशांची आहे.
भीतीमुळे बिबट्याही पिसाळला : विलासनगर परिसरात खरंतर गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बिबट्या फिरत आहे. या संदर्भात वनविभागालादेखील संपूर्ण माहिती आहे. मात्र बिबट्यानं कुठल्याही व्यक्तीवर हल्ला केला नसल्यामुळे बिबट्याला पकडण्याची कारवाई करणं उचित नाही, असा नियम वनविभागाच्यावतीनं वारंवार सांगण्यात आला. बिबट्यानं बुधवारी सकाळी मंगेश नामक एका युवकाच्या पायावर पंजा मारला. सुदैवानं त्या युवकाला गंभीर इजा झाली नाही. यानंतर परिसरात आलेल्या वनविभागाच्या वाहनावर देखील बिबट्यानं झडप टाकली. गर्दीमुळं बिबट्या झुडपात लपून बसत असताना त्याच्या शोधात वनविभागाचं पथक झुडपालगत जाताच बिबट्या अतिशय वेगात त्या ठिकाणावरून पळत सुटत आहे. एकूणच गोंधळामुळे बिबट्यादेखील पिसाळले. बिबट्यानं कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करू नये याची दक्षता वन विभागाच्यावतीनं घेतली जात आहे.
रस्ते केले बंद, झुडपात लावले लाईट : विलासनगर परिसराकडे जाणारे सर्व रस्ते वनविभाग आणि पोलीस प्रशासनाच्यावतीनं बुधवारी सायंकाळी सात वाजता बंद करण्यात आले. रात्री दहा वाजताच्या सुमारास वनविभागाच्या पथकानं ज्या झुडपात बिबट्या दडून बसला आहे, त्या भागात मोठे लाईट लावण्यात आले. वनविभागाच्यावतीनं रात्रभर बिबट्यावर लक्ष ठेवण्यात आलं. नागरिक वसाहतीतून बिबट आला त्या मार्गानं जंगल परिसरात निघून जावा यासाठी वनविभागाचं पथक प्रयत्न करीत होतं.
बिबट्याचा मुक्काम आता विदर्भ महाविद्यालय परिसराच्या प्रांगणात : रात्री दीड वाजेच्या सुमारास विलास नगर परिसरातील बिबट्या विदर्भ महाविद्यालयाच्या प्रांगणात शिरला. विदर्भ महाविद्यालयाचा परिसर देखील घनदाट झुडपांचा असून बिबट्या यापूर्वी देखील या परिसरात बराच काळ राहिला आहे. बिबट्याला विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातून देखील बाहेर काढून थेट जंगल परिसरात पोहोचविण्याचा प्रयत्न वनविभागाच्यावतीनं केला जाणार आहे.
वनप्राण्यांसंदर्भात रात्रीचे असे विशेष नियम : बिबट्या किंवा कुठल्याही वन्य प्राण्यांना रात्री अंधार पडल्यावर पकडण्याचे त्यांना बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्याचे नियम नाही. एकूणच अंधार पडल्यावर बिबट्या असो किंवा कुठल्याही वन्य प्राण्याला पकडणे हा गुन्हाच ठरतो अशी माहिती मानद वन्यजीव संरक्षक डॉ. सावंन देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. नॅशनल टायगर कंजर्वेशन ऑथॉरिटी अर्थात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार सायंकाळी पाच नंतर कुठल्याही वन्य जीवाला बेशुद्ध करता येत नाही. त्यांना पकडतादेखील येत नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या नियमांचं पालन करूनच वनविभागाचे पथक रात्री केवळ त्या बिबट्यावर लक्ष ठेवून आहेत. हा बिबट्या नागरी वसाहतीतून जंगल परिसरात कसा जाईल यासाठीच वनविभागाचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील डॉ. सावन देशमुख म्हणाले.
नागरी वसाहतीत असा आला बिबट्या : खरंतर विदर्भ महाविद्यालय परिसरात मागच्या वर्षी देखील याच काळात बिबट्या आले होते. हे बिबट्या जंगल परिसरातून सर्वात आधी श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण अशा शेती परिसरात दाखल झाले. त्यानंतर नाल्यातून ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात अनेक दिवस राहिले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुख्य रस्ता ओलांडून ते विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरात दाखल झाले. एक दीड महिन्यापूर्वी विदर्भ महाविद्यालयाच्या आवाराची भिंत ओलांडून बिबट्या विलास नगर परिसरातील नागरी वसाहतीत शिरला. अनेकांच्या घरी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्या गेल्या महिनाभरापासून रोज दिसायचा. परिसरातील कुत्र्यांची शिकार करून तो मणिपूर लेआउट या ठिकाणी असणाऱ्या विस्तीर्ण मोकळ्या जागेतील झुडपात दडून बसायचा. आता पुन्हा हा बिबट्या विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरात परतला आहे. या ठिकाणावरून त्याचा परतीचा मार्ग देखील सुरू होईल, असा वन विभागाला विश्वास आहे.
हेही वाचा :