अमरावती- चांदूर रेल्वे मार्गावरील पोहरा जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. आता तर चक्क अमरावती शहराजवळ असलेल्या एस आर पी कॅम्प परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी वॉकला जाणाऱ्या नागरिकांना सतर्कता पाळण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
अन्न पाण्याच्या शोधात प्राण्याचा वावर
जंगलात प्राण्यांना प्यायला पाणी मिळत नसल्यामुळे हे प्राणी पाण्याच्या शोधात शहरात येतात. यापूर्वीही अनेकदा नागरिकांनी अगदी जवळून बिबट्याचे दर्शन घेतले आहे. त्यात आता पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी छत्री तलाव परिसरातही बिबट्याचे दर्शन
अमरावती शहराकडून भानखेडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. या जंगलात अनेक जंगली प्राणी वास्तव्यास आहेत. सोबतच बिबट्यासुद्धा येथे वास्तव्यास आहे. भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना काही महिन्यांपूर्वी एका बिबट्याचे दर्शन झाले होते. अमरावती-भानखेड मार्गावर सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.