अमरावती - मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सिंचनासाठी आठवड्यातील केवळ काही दिवस दिवसाच्या वेळी वीज मिळत होती. शेतात पिकांना पाणी द्यायच असले तर शेतकऱ्यांना जीव धोक्यात टाकून रात्री-बेरात्री शेतात सिंचनासाठी जावे लागत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि पर्याय म्हणून अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड येथे महानिर्मिती कंपनीकडून तब्बल सोळा मेगावॉट वीजनिर्मितीचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प विदर्भातील सर्वाधिक वीज निर्मिती क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पामधून आता दररोज 70 ते 80 हजार युनिट सौर ऊर्जेची निर्मिती होते.
शेतकऱ्यांना होणार फायदा -
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत झालेला हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणारा आहे. तब्बल दीड वर्ष या प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू होते. या प्रकल्पासाठी तब्बल 80 एकर जमिनीवर 2 हजार 212 टेबलचा वापर करण्यात आला आहे. त्यावर एकूण 62 हजार सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात आले आहे. मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सिंचनासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यातही अनेक रोहित्र ओवरलोड झाल्यामुळे तासन्तास वीजपुरवठा बंद राहत होता. या सर्व अडचणी लक्षात घेता शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पात तयार होणाऱ्या ऊर्जेमुळे वरुड तालुक्यातील टेंभुरखेडा तसेच शेंदुरजनाघाट या उपकेंद्रावरील कृषी पुरवठा असलेल्या शेतकऱ्यांसह इतरही शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
गुजरातमधील कंपनीने केले काम -
विदर्भातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम गुजरात येथील कंपनीला दिले होते. दर दिवशी जवळपास 200 कुशल कामगार येथे कार्यरत होते. दर दिवशी सुमारे 2000 पॅनल बसवले जात होते.
औष्णिक वीज प्रकल्पाला पर्यायी प्रकल्प -
सध्या वीजनिर्मितीसाठी औष्णिक वीज प्रकल्पांवर अधिकाधिक अवलंबून राहावे लागत होते. मात्र दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी लक्षात घेता कोळसा किती दिवस आणि किती प्रमाणात उपलब्ध होईल, हा सुद्धा भविष्यातील मोठा प्रश्न आहे. अशावेळी सौर ऊर्जेवरील वीज निर्मिती हा एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येत आहे. शिवाय सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीत कोणतेही प्रदूषण होत नाही जे औष्णिक वीज निर्मिती द्वारे होते.
सुमारे शंभर कोटी खर्च -
सोळा मेगावॉट वीज निर्मिती करणारा हा सौर ऊर्जा प्रकल्प शंभर कोटी रुपये खर्च करून पूर्ण झाला आहे. यासाठी तब्बल 62 हजार सौर ऊर्जा पॅनल गव्हाणकुंडला लागले आहेत.
हेही वाचा - ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळांची माहिती