अमरावती- आर्थिक विवंचनेत असणाऱ्या आदिवासी बांधवांना आधार देणारी खावटी अनुदान योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी केले आहे.
कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधक उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आदिवासी बांधव अडचणीत आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील मनरेगांतर्गत विकासकामे गतीने राबवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला होता. आता खावटी योजनाही लागू करण्यात आली आहे. 2013-14 पासून ही योजना बंद होती. आता या योजनेत 100 टक्के अनुदान देण्याचा घेण्यात आला आहे. त्यानुसार ही योजना आता एकवर्षापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.
या योजनेत अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना एकूण 4 हजार रुपये कुटुंब अनुदान देण्यात येईल. ज्यामध्ये 2 हजार रुपये किंमतीच्या वस्तू आणि 2 हजार रुपये रोख त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील.
तसेच या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत आदिवासी जमातीतील कुटुंब, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे, अनाथ मुलांचे सांगोपंग करणारी कुटुंबे, वैयक्तिक वन हक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंबे आदींना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची मिताली सेठी यांनी दिली.