अमरावती - मागील दोन वर्ष कोरोना काळात गेलेत. सततची नापिकी या कारणामुळे ३ ते ४ वर्षांपासून पाणीपट्टी कर वसुली कमी झाल्यामुळे व शासनाकडून ग्रामपंचायतला मिळणारे अनुदान कमी मिळाल्यामुळे वीजबिलाचा भरणा वेळेवर करणे शक्य झाले नाही. ( Kekatpur Gram Panchayat In Amravati District ) त्यामुळे थकीत बिल वाढत गेले असे स्पष्टीकरण ग्रामपंचायतने दिले आहे.
गावकऱ्यांना पाणी पुरवठा कसा करावा ? - ग्रामपंचायत केकतपूर ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत गावात दोन विहीरी आहेत. २ ते ३ वर्षापासून त्याचे वीज बिल थकीत होते. ग्रामपंचायतकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने वीज बिल नियमित भरणा न केल्यामुळे वीज वितरण कार्यालयाने ५ महिन्यापूर्वीच एका विहीरीचा वीजपुरवठा खंडित केला होता. पुढच्या महिन्यात दुसऱ्याही विहीरीचा वीजपुरवठा बंद करू असे वीजवितरण कार्यालयाने ग्रामपंचायतीला कळवले होते. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी पुरवठा कसा करावा ? असा प्रश्न ग्रामपंचायतसमोर उभा ठाकला आहे.
केकतपूर ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरली - याच दरम्यान शासनमार्फत ग्रामपंचायतला काही प्रमाणात शासकीय अनुदान प्राप्त झाले. थकीत वीज बिलाचा प्रश्न निकाली काढण्याच्या हेतूने सभेत एकमताने ठराव पारीत करून ग्रामीण पाणी पुरवठ्यांचे दोन्ही विहिरीचे एकूण २ लक्ष ९४ हजार ५०० रु थकीत व चालू बिलाचा भरणा करून ग्रामपंचायत थकबाकी शून्य करण्यात आले. जिल्ह्यात सुमारे 1928 पाणीपुरवठा योजनांकडे सुमारे 66 कोटींवर थकबाकी असताना केकतपूर ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरली आहे.
यांनी घेतला पुढाकार - महावितरण अमरावती ग्रामीणचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर आणि उपकार्यकारी अभियंता उज्वल गावंडे, मुख्यतंत्रज्ञ नरेंद्र भुजाडे, चेतन क्षीरसागर, पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यासह केकतपूर ग्रामपंचायतीचे सरपंच चरणदास गुलाबराव भुजाडे आणि ग्रामसेवक करुणा ढवळे तथा सर्व सदस्य यांच्या पाठपुराव्यानेच शक्य झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हेही वाचा - केरळमध्ये आढळला देशातील पहिला मंकी पॉक्सचा रुग्ण; संपर्कातील 11 जण विलगीकरणात