अमरावती - भाजपचे अमरावती जिल्हा माजी अध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी सलग चार वर्षे विविध रजा कालावधीत शासनाकडून बेकायदेशीरपणे 8 लाख 51 हजार, 483 रुपये लाटलेले आहेत. ती रक्कम तत्काळ वसूल करावी, असे पत्र उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे यांनी किरण नगर स्थित नरसम्मा एज्युकेशन सोसायटी संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले आहे. प्राध्यापक असणाऱ्या भाजपच्या माजी अध्यक्षांच्या या प्रतापमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जानेवारी महिन्यात दिलेल्या आदेशानुसार कारवाई झाली की नाही, याबाबत उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तांबे यांनी 21 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा प्राचार्यां डॉ. राजेश चंदनपट यांना पत्र दिले आहे. महाविद्यालयाचे आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून आपली ही सर्वस्वी जबाबदारी असुल्याची नोंद घेऊन प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्याकडून 8 लाख 51 हजार 483 रुपये तत्काळ वसूल करून शासनाच्या खात्यात जमा करावे आणि त्याच्या चलनाची साक्षांकित प्रत तात्काळ सादर करावी, असे स्पष्ट केले आहे. भाजपचे पदाधिकारी असणाऱ्या प्राध्यापकाने असा प्रताप केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात विविध चर्चना सध्या उधाण आले आहे.