अमरावती: विभागस्तरावर प्रथम ठरलेल्या ग्रामपंचायतची महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समितीमार्फत तपासणी करण्यात येते. यातून राज्यस्तरावरील प्रथम, व्दितीय आणि तृतीय ग्रामपंचायतीची निवड करण्यात येते. यामध्ये संबंधित ग्रामपंचायतीला अनुक्रमे 25 लक्ष, 15 लक्ष व 10 लक्ष असे बक्षिस आहे.
नाविण्यपूर्ण कामाचा समितीने आढावा घेतला: विभागस्तरावर प्रथम आलेल्या सावंगा ग्रामपंचायतची तपासणी नुकतीच करण्यात आली. समितीचे अध्यक्ष अवर सचिव चंद्रकांत मोरे, कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे आणि पातरे यांनी तपासणी करुन मार्गदर्शन केले. तपासणी दरम्यान शालेय, अंगणवाडी स्वच्छता, गावपरिसर स्वच्छता, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी गुणवत्ता तसेच सांडपाणी व्यवस्थान, लोकसहभाग तसेच श्रमदानातून केलेली कामे अशा आणि इतर नाविण्यपूर्ण कामाचा समितीने आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, वरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आरोग्य आणि शिक्षण विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.