अमरावती - भाजपमध्ये गेल्या काही दिवसांत इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांचा ओघ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्या असून आता भरती नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येते भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मागील 5 वर्षातील केलेल्या कामांचा पाढा जनतेसमोर वाचला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जनता मालक असून आम्ही जनतेचे सेवक आहोत, असे सांगत या जनतेचा आशीर्वाद घेऊनच आम्ही गेल्या पाच वर्षात दुप्पट-तिप्पट काम करू शकलो. आमच्या सरकारने राज्यात उद्योग आणले. आघाडीने गेल्या 15 वर्षात काय काम केलं? ते त्यांनी सांगावे, असे थेट आव्हानच मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला दिले आहे. तसेच महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तुकडोजी महाराजांच्या महासमाधीला 'अ' तीर्थक्षेत्राचा दर्जा -
या वेळी जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेवर प्रकाश टाकत तुकडोजी महाराजांच्या महासमधीला 'अ' तीर्थक्षेत्राचा दर्जा सोबतच विकासासाठी 100 कोटींची घोषणाही केली.