अमरावती - नवीन वर्षाला माझे काही वेगळे संकल्प नाही. नवीन वर्षात महाराष्ट्रावरची, देशावरची संकटे दूर व्हावीत. शेतकऱ्यांचे नव वर्ष सुखा समाधानाचे जावे, अशी अपेक्षा आहे. यासोबत राज्यात जे सरकार आहे त्या सरकारला नवीन वर्षामध्ये सुबुद्धी मिळावी आणि चांगले काम करण्याची शक्ती त्यांना ईश्वराने द्यावी इतकीच अपेक्षा असल्याचे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा - '31 डिसेंबरला रात्री 11 नंतर घराबाहेर पडू नका; कारवाई होणार'
खासदार नवनीत राणा यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त देवेंद्र फडणवीस शासकीय विश्राम भवन येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मी मुख्यमंत्री असताना पाणीपुरवठा योजनेसाठी पुणे महापालिकेला निधी दिला होता. आता हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. उद्या पूर्णतः शासकीय कार्यक्रमात या प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त मी उपस्थित राहणार असून, पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी एका मंचावर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संकुचित वृत्ती सोडा
आपल्याकडे अलीकडच्या काळात फार संकुचित विचार चालला आहे. कुठला आमदार एखाद्या व्यक्तीला भेटला तर तो त्या पक्षात जाणार, कोणी कोणाची भेट घेतली की तो व्यक्ती दुसऱ्या पक्षामध्ये जाणार, किंवा कोणी कार्यक्रमात आले की एकत्रित येणार. माध्यमांना विनंती आहे की त्यांनी संकुचित विचार सगळे सोडावे. कोणी कुठे जात नाही. आम्हाला सत्तेत यायचे तेव्हा आमच्या भरवशावर आम्ही सत्तेत येऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - ग्रामीण भागातील युवक ठरला 'मिस्टर खादी-2020'चा विजेता