अमरावती - मध्यप्रदेशातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ५ डंपर धारणी महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत. मेळघाटातील गडगा प्रकल्पासाठी या वाळूची वाहतूक झाल्याचे समजले आहे. ही कारवाई १८ फेब्रुवारीला पहाटे ३ च्या सुमारास कुसूमकोट खुर्द मार्गावर करण्यात आली. कारवाईत पोलिसांनी तब्बल 21 लाख 66 हजारांचे साहित्य जप्त केले आहे.
हेही वाचा - अमरावतीतील ३६ तासांच्या लॉकडाऊनमुळे एसटीला ४५ लाखांचा फटका
अंधाराचा फायदा घेत एक डंपर चालक डंपरसह पळून जाण्यात यशस्वी झाला. अवैध वाळूची वाहतूक करणारे डंपर हे नितीन बिश्नोई (रा. पिंपळखेड मध्य प्रदेश) यांच्या मालकीचे असून विनोद चंद्रसिंग डोंगरे, देवराजसिंग शैताणसिंग भुसारे, राकेश लखनलाल दुर्वे, लालू रामजी यादव, गुरमितसिंह जोगिंदरसिंह खालसा व पळून गेलेल्या एका चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई एसडीओ मिताली शेट्टी, तहसीलदार अतुल पडोळे यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
काही दिवसांपूर्वी वरूड येथेही मोठी कारवाई
मध्य प्रदेशातील कन्हान नदीतून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जाते. ही रेती वरूड मोर्शी मार्गे अमरावती जिल्ह्यात दाखल होत असते. अशाच प्रकारे वाहतूक करणाऱ्या तब्बल तीसपेक्षा अधिक डंपरवर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली होती.
हेही वाचा - अखेर राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल; कोरोना नियमांचे पालन न करणे भोवले