अमरावती - रासायनिक खत तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता खताचे उत्पादन करून ते खत विक्री करणाऱ्या वितरक आणि उत्पादक कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत फत्तेपूर गावात १ लाख २७ हजार ४०० रुपयाच्या किंमतीचे तब्बल १०८ पोते जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या पोत्यांवर 'डीएफी'ऐवजी 'बीएपी' असे नमूद करुन शेतकऱ्यांना 'डीएपी' खत असल्याचे भासवून विक्री केली जात होती.
रासायनिक खत तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता मोठ्या प्रमाणात खताचे उत्पादन करून ते विना परवाना विक्री होत असल्याची माहिती वरुड तालुक्यातील खत निरीक्षकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास वरुड तालुक्यातील फत्तेपूर गावात तब्बल १०८ पोती बनावट रासायनिक खत जप्त करून वितरक व उत्पादक कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यापैकी अनेक बॅगवर 'डीएपी'ऐवजी 'बीएपी'असे नमूद करून शेतकऱ्यांना 'डीएपी' भासवून विक्री केली जात असल्याचे कारवाई पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागपूर येथील खत वितरक नीलकांत मधुकर ढबाले, मारोती इंडस्ट्रीज परमल कासा आणि मेसर्स मायक्रो बायोटेक, (सावनेर, जि. नागपूर) या दोन कंपन्यांच्या मालकाविरुद्ध वरूड पोलीस ठाण्यात तालुका कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
अशी केली कारवाई -
मोठ्या प्रमाणात बनावट रासायनिक खतांची विक्री होत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक आगरकर आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आगारकर आणि त्यांचे पथक तालुक्यातील फत्तेपूर गावात रात्रीच्या सुमारास दाखल झाले. त्याचदरम्यान नीलकांत ढबाले हा बोलेरो पिकअप मालवाहू वाहन घेऊन आला. या वाहनात बीएपी नवरत्नची ५० पोती, शक्तीमान सॉईल कंडिशनरची २० पोती, चमत्कार सॉइल कंडिशनरची ३८ पोती, अशा एकूण १ लाख २७ हजार ४०० रुपयांच्या किंमतीची १०८ पोती होती.
भरारी पथकाने हे खत पकडल्यानंतर चालक नीलकांत ढबालेला खत विक्रीचा परवाना तसेच खत उत्पादित करण्याचा परवाना मागितला. मात्र तो त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे भरारी पथकाने हा खत साठा जप्त करून कायदेशीर कारवाई केली.