अमरावती - जिल्हात गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे आज अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात बैठक घेतली. यावेळी त्यांनी वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता, यावर चिंता व्यक्त केली. तसेच पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जायचे नसेल, तर कोरोनाचे नियम पाळा लागतील, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
सोमवारी वाढले तबल २३५ रुग्ण -
आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अधिकारी वर्गांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या. कोरोनाची लाट पुढे येऊ नये, यासाठी कोरोना नियम पाळा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अमरावती जिल्हात दररोज कोरोना रुग्ण वाढत आहे. काल तब्बल २३५ रुग्ण वाढल्याने जिल्हात आतापर्यंत २३२९३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी २२२६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४२४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
योग्य ती खबरदारी घेतलीच पाहिजे -
कोरोनाची लढाई ही निर्णायक टप्प्यावर आली आहे, असे आपल्याला वाटत होते. पण आता अमरावती जिल्हाच नाही, तर अमरावती विभागात सुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे आता आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. मागील वर्षीसुध्दा याच वेळेस यूरोपमध्ये लॉकडाऊन लागले होते. त्यामुळे अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ नये, यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
सोमवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू -
अमरावती शहरातील गवळीपुरा परिसरातील ६३ वर्षीय पुरूष व्यक्ती कोरोनाबाधित असल्याने त्यांचा बेस्ट रुग्णालयात उपचार सुरू होता. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ४२४ वर पोहोचली आहे.
हेही वाचा - शशी थरुर यांच्यासह पत्रकारांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती