अमरावती - राजस्थानच्या श्रीगंगानगरच्या रेल्वेस्थानकावरून तिरुचिरापल्लीकडे निघालेल्या हमसफर एक्सप्रेसचा मार्ग पावसामुळे अचानक बदलण्यात आला. त्यामुळे ही एक्सप्रेस सकाळी पुण्याला पोहोचण्याऐवजी चक्क बडनेराला पोहोचली. सकाळी प्रवाशांना हा सर्व प्रकार समजल्यावर प्रवाशांनी चांगलाच गोंधळ घातला.
पूर्ण वातानुकुलीत असणारी हमसफर एक्सप्रेस आज सकाळी साडेआठ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचली. बऱ्याच वेळापर्यंत गाडी एकाच ठिकाणी उभी असल्याने प्रवाशांच्या लक्षात आले की, गाडी बडनेरा स्थानकावर पोहोचली आहे. त्यावेळी प्रवाशांनी रेल्वे अॅपवर गाडी कोठे आहे, हे पाहिले असता गाडी पुणे स्थानकावर उभी असल्याचे दाखवत होते. त्यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला. गाडी पुण्याच्या दिशेने नव्हे, भुसावळ पार करून जवळपास 300 किमी उलटा प्रवास झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.
विशेष म्हणजे सुरत स्थानकापासून गाडीत टीसी नसल्याने तसेच गाडीत जीपीएस सेवासुद्धा ठप्प असल्याने प्रवाशांना रात्रभर आपला प्रवास नेमका कोणत्या दिशेने होत होता, हे लक्षातच आले नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आपली फसवणूक केली असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
यावेळी प्रवाशांनी स्टेशन मास्तरला जाब विचारला असता, स्टेशन मास्तरने याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. भुसावळ येथून सुद्धा हमसफर एक्सप्रेसबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे स्टेशन मास्तरने सांगितले. दरम्यान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्थानकावर नागपूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस आली तेव्हा संतप्त प्रवाशांनी आमची गाडी जोपर्यंत हलणार नाही, तो पर्यंत ही गाडीसुद्धा येथून जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रेल्वे पोलिसांनी फलाटावर बंदोबस्त वाढवला होता. रेल्वे प्रशासनाने अडीच वाजता येणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसने या गाडीतील प्रवाशांनी पुढील प्रवास करावा, असे आवहान केले. मात्र, आम्हाला कर्नाटकात जायचे आहे, आम्ही कसे जायचे ? असा सवाल कर्नाटकातील प्रवाशांनी उपस्थित केला. यामुळे हा गोंधळ वाढतच गेला.
महाराष्ट्र एक्सप्रेस फलाटावर आली तेव्हा हमसफर एक्सप्रेसच्या प्रवाशांना महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात आली. तेव्हा आम्ही आलो तीच गाडी परत न्या, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्यावेळी ते शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. त्यानंतर कंटाळलेल्या पुण्याच्या प्रवशांनी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इतर प्रवाशांचीही सोय होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना सांगितले.