अमरावती - इतिहासात प्रथमच अमरावती महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या 'महिलेच्या' हाती आली आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती म्हणून महिला नगरसेविकेची निवड करण्यात आली आहे. राधा कुरील असे या नगरसेविकेचे नाव आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवड शुक्रवारी पार पडली. भाजपची सत्ता असलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच राधा कुरील या महिला नगर सेविकेची स्थायी समितीच्या सभापती पदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे 8 तारखेला साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या एक दिवस आधी राधा कुरील यांना स्थायी समितीच्या सभापती विराजमान होण्याचा मान मिळाला आहे.
हेही वाचा - 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला जाणार'
यावेळी स्थायी समितीच्या नवनियुक्त सभापती माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, भाजप पक्षाने माझ्या सारख्या एका महिलेवर विश्वास टाकून मला सभापती केले आहे. त्याचे मी सार्थक करेन. महिलांसाठी सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहचवेन. तसेच बचत गटाच्या माध्यमातून वस्तू निर्माण करणाऱ्या महिलांसाठी एक स्वतंत्र बाजारपेठ म्हणून शहरात एक मॉल उभारनार असल्याचेही त्या म्हणाल्या. महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाची निवड सर्व स्थायी समितीच्या सदस्यांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली.