अमरावती : अमरावती ते कुऱ्हा मार्गावर उजव्या दिशेने उजाड झालेल्या जंगलातील उंच भागावर हनुमानाचे मंदिर आहे. विरगव्हाण मारुती मंदिर या नावाने हा परिसर ओळखला जातो. आज उजाड जंगलात या हनुमानाची पूजा करायला शेकडो भाविक दर मंगळवारी आणि शनिवारी येतात. या परिसरात विरगव्हाण नावाचे एक गाव वसले होते. या गावाच्या वेशीवर हनुमानाची आक्राळ, विक्राळ अशी भव्य मूर्ती स्वयंभू प्रकटली होती. ग्रामस्थ या हनुमानाची पूजा करायचे. सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामी या परिसरात आले असताना ते हनुमानाचे हे आगळे वेगळे रूप पाहून भारावून गेले होते. त्यांनी गावाच्या वेशीवरच दगडांच्या पाड्यांनी भव्य असा ओटा उभारला आणि त्यावर या हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून हनुमानाची ही भव्य मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे.
स्वप्नात जाऊन दिला संदेश: विरगव्हाण गावात दीडशे वर्षांपूर्वी एक भयंकर आजार आला होता. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ शेजारच्या भागात राहायला गेले. या परिसरापासून जवळच असणाऱ्या कारला या गावात वीरगव्हाण येथील अनेक कुटुंब आज देखील आहेत. कारला या गावात राहणाऱ्या राजपूत कुटुंबीयांच्या भाटांकडे वीरगव्हाणचा उल्लेख असून या ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची स्वतः समर्थ रामदास स्वामींनी प्राणप्रतिष्ठा केल्याचा उल्लेख सापडतो अशी माहिती हनुमान मंदिराचे अध्यक्ष शामराव वाघमारे यांनी दिली. त्यांना स्वतःला देखील या हनुमानाच्या चमत्कारांची प्रचिती आली असल्याचे शामराव वाघमारे यांनी सांगितले. बऱ्याच वर्षाआधी ते या परिसरात आले. त्यावेळी हनुमानाची मूर्ती उघड्या ओट्यावर होती. विरगव्हाण महाराज त्यांच्या स्वप्नात जाऊन मला उघड्यावर ठेवू नको असे म्हणाले. या स्वप्नाबाबत त्यांनी गुरुजींना विचारले असता विरगव्हाण येथील ओट्यावर हसणाऱ्या हनुमानाचे मंदिर बांध असा या स्वप्नाचा अर्थ होतो. असे त्यांनी सांगितले होते.
स्वखर्चाने मंदिर बांधले: विशेष म्हणजे या ठिकाणी अनेकांनी हनुमानाच्या मंदिरावर छत बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र यापूर्वी जितक्यांदा छत बांधण्यात आले ते छत कोसळले होते. मात्र गुरुजींनी मला देखील मंदिर बांधण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्वखर्चाने मंदिर बांधण्यास सुरुवात केली. सहा कॉलम उभारून मंदिर बांधण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे यावेळी मंदिर बांधले तेव्हा मंदिराचे छत कोसळले नाही. या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर अमरावती शहरातील अनेक भाविकांनी आपापल्या परीने मंदिरासाठी पैसे दिलेत. काहींनी या ठिकाणी मार्बल लावून दिले. हनुमान मंदिरालगतच श्रीरामाचे मंदिर देखील उभारण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर या मंदिराच्या मागे असणारी टेकडी खोदून त्या ठिकाणी भोजन कक्ष उभारण्यात आले. दर मंगळवारी आणि शनिवारी वीरगव्हाण नरेशाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात. मंगळवारी आणि शनिवारी या ठिकाणी अनेक भाविक स्वयंपाक करतात. या हनुमानाच्या दर्शनाला नियमित येणाऱ्यांचे अनेक प्रश्न सुटले अशी अनेक उदाहरणे असल्याचे देखील शामराव वाघमारे यांनी सांगितले.
हनुमान जयंतीला मोठा उत्सव: विरगव्हाण नरेश म्हणून ओळखला जाणारा जंगलातील नवसाला पावणाऱ्या ह्या हनुमानाच्या दर्शनाला दर मंगळवारी आणि शनिवारी भाविक मोठ्या संख्येने येतात. हनुमान जयंतीला दरवर्षी या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या प्रवाहावर पहाटे चार वाजता हनुमंताला अभिषेक झाल्यावर दिवसभर भजनाचे कार्यक्रम या ठिकाणी होतात. विशेष म्हणजे या हनुमंतावर श्रद्धा असणारे शेकडो भाविक या ठिकाणी अन्नदान करतात. हिरवीगार झाडे आणि डोंगर अशा परिसरात वसलेल्या वीरगव्हाण येथील हनुमानाच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविकाला या ठिकाणी आगळी वेगळी अशी मनशांती लाभते.
हेही वाचा: Mahalakshmi at Ganoja Devi कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा नवस तुम्ही येथेही फेडू शकता