अमरावती - विद्युत भवनासमोर आपल्या सहकाऱ्यांसह उपोषणाला बसलेल्या तरुण निखिल अरुण तिखे या नवरदेवाला आज उपोषण मंडपातच हळद लागली. आज मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर शुक्रवारी उपोषण मंडपातच निखिलचे लग्न देखील होणार आहे.
बदल्यांचा प्रश्न आणि प्रशासकीय आस्थापणेकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात वर्कर्स फेडरेशनने गेल्या 9 जुलैपासून विद्युत भवनासमोर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उपोषणात सहभागी निखिल तिखे यांचे लग्न पूजा लकडे या तरुणीसोबत 19 जुलैला राहाटगाव रिंग रोडवरील कल्पदीप लॉन येथे सकाळी 10.45 वाजता होणार होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिकाही वितरीत करण्यात आल्या. मात्र, विद्युत कंपनीने उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याने निखिल तिखे यांना आपले लग्न उपोषण मंडपातच करण्याचा निर्णय घेतला.
उपोषण मंडपातच नवरदेवाला हळद लावण्याचा कार्यक्रम आज घेण्यात आला. निखिल तिखे यांच्या कुटुंबियांनी उपोषण मंडपात येऊन नवरदेवाला हळद लावली. यावेळी निखिल तिखे यांच्या आईला गहिवरून आले. मुलाच्या मागण्या मंजूर केल्या असत्या तर घरीच धडाक्यात हळदीचा कार्यक्रम झाला असता. मात्र, आज हा सोहळा उपोषण मंडपात होत असला तरी मुलाच्या लग्नाचा आनंद वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. हळदीच्या कार्यक्रमात तिखे कुटुंबियांसह वर्कर्स फेडरेशनचे सदस्यही सहभागी झालेत. एकमेकांना हळद लावून सर्वांनी हा सोहळा अविसमरणीय ठरेल असा साजरा केला.