अमरावती - राज्यात गुटखा विक्रीवर 2012 पासून बंदी असताना अमरावती शहर आणि जिल्ह्यात प्रत्येक गल्लीत गुटखा विक्री होत असून प्रशासनाने या अवैध गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करीत रविवारी होळीच्या पर्वावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने गुटखा पुड्यांची होळी केली. जिल्ह्यात कुठेही गुटखा विक्री होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी केली.
अमरावती शहर हे गुटख्याचे केंद्र बनले असून जिल्ह्यातून राज्यातील अनेक भागात गुटखा जातो. तसेच मध्यप्रदेश सीमेलागतही गुटख्याची तस्करी केली जाते. दिवसाढवळ्या अवैध असणारा गुटखा सररास कुठेही उपलब्ध होत असताना प्रशासनाने याकडे डोळेझाक केली असल्याचा आरोप संगीता ठाकरे यांनी केला. चांदूरबाजार तालुक्यात सतत गुटखा खात आल्यामुळे अनेक युवकांचे तोंड उघडत नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात गुटख्यामुळे अनेक युवक कर्करोगाच्या विळख्यात सापडले आहेत. युवकांसोबतच अल्पवयीन मुले, महिला गुटख्याच्या आहारी गेले असून येणाऱ्या काळात गुटख्यामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र गुटखा मिळत असल्याचा पुरावा म्हणजे आम्हीच आज मोठ्या प्रमाणात गुटखा मिळवून त्याचे दहन केले आहे. आता जबादारी ही प्रशासनाची आहे. प्रशासनाने सामाजिक भान राखून गुटख्याविरोधात धडक कारवाई सुरू करावी, असेही संगीता ठाकरे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणल्या.
कठोरा नाका परिसरात गुटख्याची होळी करताना संगीता ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कल्पना वानखडे, ममता हुतके, संगीता देशमुख, अस्मिता भडके, सरला इंगळे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होत्या.