अमरावती Guru Nanak Jayanti 2023 : शहरात 1940 नंतर पंजाब मधून शीख समाजातील काही मंडळी रोजगाराच्या निमित्ताने विदर्भात आली. त्यापैकी आठ, दहा कुटुंब अमरावतीत आले आणि स्थायिक झालेत. अमरावतीच्या मातीशी एकरूप झाल्यावर 1950 मध्ये शहरातील बुटी प्लॉट परिसरात गुरुद्वाराची स्थापना करण्यात आली. त्यावेळी सरदार हरनामसिंगजी उबोवेजा, सरदार जगतसिंग मोंगा, सरदार सिंगजी बग्गा, सरदार हरदेव सिंगजी ओबेरॉय, सरदार प्रीतपालसिंगजी नंदा, सरदार जसवंतसिंगजी जग्गी, सरदार सिंगजी सहानी, सरदार हरनाम सिंगजी अरोरा यांच्या पुढाकाराने गुरुद्वाराची स्थापना करण्यात आल्याची माहिती, श्री गुरु सिंगजी सभाचे सचिव शरण पालसिंग अरोरा यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
1996 पासून गुरुद्वाराने घेतले भव्य स्वरूप : शहरात सध्या बोटावर मोजण्याइतकेच म्हणजे शीख आणि पंजाबी समाजाचे दीडशे कुटुंब आहेत. यापैकी पंजाबी समाजाचे 25 ते 30 कुटुंब आहेत. डोक्यावर पगडी न बांधणाऱ्या या पंजाबी समाजाची मोना पंजाबी अशी ओळख आहे. 1950 मध्ये स्थापन झालेल्या 'बुटी प्लॉट' येथील गुरुद्वाराच्या विकासासाठी संपूर्ण शीख आणि पंजाबी समाज एकत्रित आला आणि 1996 पासून गुरुत्वाराच्या विकासाला नव्याने सुरुवात झाली. चार ते साडेचार वर्ष गुरुद्वाराच्या विकासासाठी लागले आणि 2002 मध्ये अमरावती शहरात भव्य अशा गुरुद्वाराची निर्मिती झाली. विशेष म्हणजे गुरुद्वारा निर्मितीसाठी इतर कुठल्याही धर्माच्या किंवा समाजाच्या व्यक्तींची मदत न घेता केवळ शीख आणि पंजाबी समाजाच्या वर्गणीतूनच हा गुरुद्वारा उभारला गेला. या गुरुद्वाराला श्री गुरु सिंगजी सभा असे म्हटले जाते. अमरावती शहरात बेलपुरा परिसरात असणारा गुरुद्वारा तसेच वर्षभरापूर्वी बडनेरा येथे झालेला गुरुद्वारा या श्री गुरु सिंगजी सभा गुरुद्वारा अंतर्गतच येतात. सर्वच जिल्ह्यात असणारे श्री गुरुसिंगजी सभा गुरुद्वाराला सर्वाधिक महत्त्व आहे.
व्यवसाय क्षेत्रात दबदबा : अमरावती शहरात वसलेल्या शीख समाजाचा प्रमुख व्यवसाय हा हॉटेलिंग आहे. अमरावती शहरात सर्वाधिक स्वादिष्ट जेवण हे शीख समाजाच्या प्रसिद्ध अशा हॉटेलमध्येच मिळते. यासह फर्निचर व्यवसायात देखील शीख समाज आघाडीवर आहे. फुटवेअरची नामांकित प्रतिष्ठान देखील शीख समाजाच्या व्यक्तींचीच आहेत. यासह ठेकेदारी आणि ट्रक-ट्रान्सपोर्ट क्षेत्रात देखील शीख समाजाचा दबदबा आहे.
राजकारण आणि क्रीडा क्षेत्रात ठसा : अमरावतीच्या राजकारणात देखील शीख समाजाचा मोठा वाटा आहे. शीख समाजाच्या महिला रिना नंदा या 2014 मध्ये अमरावतीच्या महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. क्रीडा क्षेत्रात देखील शीख समाजाचे युवक विविध खेळात निपुण असून दशक भरापूर्वी रणजीतसिंग राहल या युवकाने 'विदर्भ केसरीचा' मान पटकावला. आज तो पोलीस विभागात कार्यरत असून क्रीडा क्षेत्रात देखील त्याचे मोठे नाव आहे. अमरावती शहरातील प्रा.राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असणारे डॉ. निक्कू खालसा हे शिक्षण क्षेत्रात महत्वाचे नाव आहे.
गुरुनानक जयंतीचा उत्साह : शीख, पंजाबी आणि सिंधी समाजाच्या वतीने गुरुनानक जयंती उत्साहात साजरी केली जाते. बुटी प्लॉट येथील गुरुद्वारा कृष्णाईने सजविण्यात आला असून गत तीन दिवसांपासून भजन कीर्तन सोहळा या ठिकाणी होत आहे. गुरुनानक जयंतीच्या पर्वावर आठ ते दहा हजार जणांसाठी लंगरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. शीख पंजाबी सिंधी समाजासह सर्वच धर्मातील अनेक जण गुरुद्वारात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. गुरुनानक जयंतीच्या पर्वावर सर्वत्र सुख शांती नांदावी असाच संदेश समाजाच्या वतीने दिला जात असल्याचं शरणपाल सिंग अरोरा यांनी सांगितलं.
हेही वाचा -