अमरावती - मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी निवडणूकीची रंगत वाढताना दिसत आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात १८ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या धुमधडाक्यात सध्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत असणाऱ्या बाऊन्सर्सची चर्चा अधिक होत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या प्रचारात गत दोन तीन दिवसांपासून त्यांच्या भोवताली असलेले बाऊन्सर्स खास चर्चेचा विषय झाले आहेत. देवपारेंना अशा बाऊन्सर्सची गरज का पडली असावी, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.
बाऊन्सर्सबाबत पत्रकारांनी देवपारे यांना छेडले असता लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान अनेक धोके असतात. पोलीस सुरक्षा मागण्याइतके पैसे माझ्याकडे नाहीत. माझ्या सरंक्षणासाठी लोक स्वयंस्फूर्तीने समोर येतात. माझी मदत करतात, असे स्पष्टीकरण गुणवंत देवपारे यांनी दिले आहे.