अमरावती - मोबाईल घेण्यासाठी पैशाची चणचण असल्याने आजीच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेत नातवानेच आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीतून समोर आली आहे. जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी या गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी नातू सूरज आमझरेला पोलिसांनी अटक केली आहे.
खाक्या दाखवताच आरोपीने खुनाची कबुली -
ब्राम्हणवाडा थडी येथील आमझरे कुटुंबातील गिरजाबाई आमझरे (७५) यांची नातवानेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हत्या केल्यानंतर गिरजाबाई यांचा मृतदेह घरातच पडून होता. हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असता मारेकरी हा ओळखीतील व कुटुंबातील असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयाच्या आधारे सूरज आमझरेला ताब्यात घेतले. त्यावेळी सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने खुनाची कबुली दिली.
संधीचा फायदा घेत केला वार -
सूरज हा गिरजाबाई यांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या मुलाचा मुलगा आहे. सूरज हा शेती व मजुरीचे काम करतो. त्याला मोबाईल खरेदी करायचा होता. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. या विवंचनेत असतानाच तो गिरजाबाईच्या घरात गेला. त्यावेळी आजोबा अण्णा आमझरे घरात नव्हते. या संधीचा फायदा घेत गिरजाबाईच्या गळ्यातील सात ते आठ ग्रॅमच्या सोन्याच्या पोतीवर चुलीजवळ असलेल्या लोखंडी शस्त्राने मानेवर वार करुन पोत घेऊन तो पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.