अमरावती - जिल्ह्यातील हजारो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या शेकडो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासना कडे पाठवल्या.
ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ज्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका महानगरपालिका प्रमाणे वेतन द्यावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदन लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी रक्कम कामगार भविष्य निधी संकलन कार्यालयात जमा करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणे, कर्मचार्यांच्या वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्यासाठी आज जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. यावेळी आपल्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिला.