अमरावती: जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. एकीकडे निवडणुकीसाठी कालपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू झाली असून त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळव करण्यास सुरवात झाली आहे. तर दुसरीकडे गावनेत्यांच्या शहरातील आणि गावातील बाहेरगावी असलेल्या मंडळीशी गाठीभेटी वाढल्या आहेत.
गाठीभेटी वाढवण्यात गाव नेते व्यस्त: गावातील बरीचशी मंडळी व्यवसाय वा नोकरी या निमित्ताने शहरात स्थायिक आहेत. मात्र त्यांचे मतदान नाव अजूनही गावच्या मतदार यादी मध्येच आहे. त्याचप्रमाणे काही युवक आणि काही कामगार सुद्धा बाहेरगावी स्थायिक झाले आहेत. त्या सर्व नागरिकांचे मतदान गावातच आहे. त्यापैकी कोणाचे मतदान कुठल्या वार्डात आणि गावात आहे. हे गाव नेत्यांना चांगलंच माहीत असते, म्हणूनच अशा लोकांशी संपर्क करून त्यांच्याशी गाठीभेटी वाढवण्यात गाव नेते व्यस्त झाले आहेत.
निवडणूक कार्यालयात सादर: मतदान 18 डिसेंबरला होणार आहे. याकरिता इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून सादर करायचा आहे. त्याचबरोबर या अर्जाची प्रिंट घेऊन ती ऑफलाईन पद्धतीने निवडणूक कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरला, तरी तो जोपर्यंत निवडणूक कार्यालयात सादर करत नाही. तोपर्यंत ग्राह्य मानला जाणार नाही, असे निवडणूक कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
रक्कम जमा करणे आवश्यक: ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. खुल्या गटात अर्ज भरणाऱ्यांना ५०० रुपये तर राखीव गटासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.