अमरावती - अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे नुकसान झाले. तथापि, शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. राज्य शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे. महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या समन्वयातून राज्यातील अतिवृष्टी नुकसानाबाबत पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पार पाडून शेतकरी बांधवांना मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.
हेही वाचा - अमरावतीत कोरोनानंतर डेंग्यूचा प्रादूर्भाव; रुग्णलयात हजारोंची गर्दी, शहरात फवारणी
अतिवृष्टी भागाची केली पाहणी
कृषी मंत्र्यांनी आज जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील टाकरखेडा, रामा, साऊर, खारतळेगाव, वलगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतशिवाराची पाहणी केली व शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली.
पंचनामे प्रक्रियेला गती
ज्या ज्या भागात शेतीपिकांचे नुकसान झाले, तेथील पंचनामा प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे राज्यभर संयुक्तपणे ही प्रक्रिया होत आहे. शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. जिल्हा प्रशासनाने सविस्तर पंचनामे करून प्रस्ताव सादर करावेत. पुढील काळात दुबार पेरणीचे संकट टळण्यासाठी बियाण्यांबाबत विचार व संशोधन होत आहे. पेरणीपूर्वी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे यंदा सोयाबीन बियाण्याची कमतरता जाणवली नाही. उगवणीच्या तक्रारीही कमी झाल्या असल्याचे कृषिमंत्री भुसे म्हणले.
नुकसानग्रस्त विमाधारकांनी तात्काळ माहिती कळवावी
पीक विमा योजनेत सहभागी शेतकरी बांधवांनी तात्काळ कंपनीला माहिती द्यावी. संपर्कात अडथळे येत असतील तर त्या पत्राच्या प्रती कृषी कार्यालय, तहसील कार्यालय व ज्या बँकेत विम्याचा हप्ता भरला, त्यांनाही उपलब्ध करून द्याव्यात. नुकसानग्रस्तांकडून अशी प्रत प्राप्त होताच ती विमा कंपनीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी त्या त्या कार्यालयांची असेल. त्यासाठी या कार्यालयांनी पीक विमा मदत कक्ष स्थापन करावेत, असे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले.
हेही वाचा - VIDEO : अमरावतीमधील पूर्णा धरण ओव्हरफ्लो; 9 दरवाजे उघडले