अमरावती - मेळघाटातील 50 पेक्षा अधिक गावात पाण्याच्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे 30 टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईमुळे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेली बालिका बादली ओढत असताना तोल जाऊन विहिरीत पडली. त्यामुळे त्या बालिकेला जीव गमवावा लागला आहे. मनीषा धांडे असे त्या विहिरीत पडून मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे. ही घटना चिखलदरा तालुक्यातील मोथा गावात घडली.
मनीषा विहिरीतून पाणी काढत असताना तिचा तोल गेल्याने ती विहिरीत पडली. त्यानंतर ती गंभीर जखमी झाली. तिला नागपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मृत्यूशी तिची झुंज अखेर संपली. एक हंडा पाण्यासाठी जीव गमवावा लागतो, त्या मेळघाटात पाणी टंचाई किती भीषण असेल याची प्रचिती येते.
मेळघाटातील डोंगराळ परिसरात 50 हुन अधिक गावात भीषण पाणी टंचाई आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीठ हे रोजचेच काम आहे. परिसरातील विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. मेळघाटात 30 हुन अधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. तरी देखील मेळघाटाची तहान भागत नाही. गावात पाण्याचा टँकर येतो, त्यावेळी पाण्यासाठी झुंबड होते. काही गावात पाण्याचा टँकर विहिरीमध्ये पाणी सोडतो.
सर्वत्र पावसाची वाट असताना मृग नक्षत्रात देखील पाऊस न आल्याने जिल्ह्यातील धरणात 13 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात पाण्यासाठी भटकंती होणार आहे.
15 वर्षीय चिमुकलीचा बळी गेल्यानंतर आता मात्र प्रशासन कशा पद्धतीने नियोजन करून गावातील पाण्याची वणवण थांबवते हे आता महत्वाचे ठरणार आहे.